समृद्धी महामार्गाविषयीच्या शंकांचे समाधान
By Admin | Updated: March 2, 2017 02:33 IST2017-03-02T02:33:24+5:302017-03-02T02:33:24+5:30
समृद्धी महामार्ग अर्थात नागपूर-मुंबई सुपर कम्युनिकेशन एक्स्प्रेस वे विषयी शेतकऱ्यांच्या मनात असलेल्या शंकांचे जाहीर सुनावणीत

समृद्धी महामार्गाविषयीच्या शंकांचे समाधान
जाहीर सुनावणी : १० जिल्हे, २४ तालुके, ३८५ गावे जोडणार
नागपूर : समृद्धी महामार्ग अर्थात नागपूर-मुंबई सुपर कम्युनिकेशन एक्स्प्रेस वे विषयी शेतकऱ्यांच्या मनात असलेल्या शंकांचे जाहीर सुनावणीत समाधान करण्यात आले. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने मंगळवारी हिंगणा तालुक्यातील वडगाव गुजर गावातल्या एका शेतात ही सुनावणी घेतली.
नागपूर ते वर्धा या ८९.३५५ किमी अंतराच्या पट्ट्यापर्यंत ही सुनावणी मर्यादित होती. महामंडळाचे अधीक्षक अभियंता यू. जे. दाबे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून महामार्गाच्या वैशिष्ट्यांची माहिती दिली. महामार्गासाठी नागपूर जिल्ह्यातील २१ गावांमधील तर, वर्धा तालुक्यातील ३४ गावांमधील एकूण १५२०.०४ हेक्टर जमीन लागणार असून त्यापैकी ४९.२२ हेक्टर वनजमीन असल्याचे दाबे यांनी सांगितले.
अतिरिक्त जिल्हाधिकारी के. एन. के. राव यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयात शेतकऱ्यांना वैयक्तिक स्तरावर आवश्यक ती माहिती उपलब्ध होईल अशी माहिती दिली. ७०२ किमी लांबीचा हा महामार्ग १० जिल्हे, २४ तालुके व ३८५ गावांना जोडणार आहे. हा महामार्ग पूर्ण झाल्यानंतर मुंबई-नागपूर प्रवासाचा कालावधी १६ तासांवरून घटून अवघ्या ८ तासांवर येईल. स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. कृषी विकासाला चालना मिळेल याकडे शेतकऱ्यांचे लक्ष वेधण्यात आले.(प्रतिनिधी)