निशांत वानखेडे, नागपूरनागपूर : गेल्या काही दिवसात विदर्भाच्या शहरांची जगभरातील शहरांशी उष्णतेची स्पर्धाच लागली आहे. सर्वात उष्ण शहरांमध्ये बुधवारी ब्रम्हपुरी, चंद्रपूर, अकाेला शहराने ४५ पार जात उच्चांक गाठला. दुसरीकडे नागपूरसह इतर चार शहरे ४४ अंशाच्यावर चालले आहेत. अशात सूर्याच्या अग्निज्वाळा सुरुच असून पुढचे तीन दिवस ‘हिट वेव्हज’चा सामना करावा लागेल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
मंगळवारी चंद्रपूर शहर ४५.८ अंशासह दुसऱ्या क्रमांकावर हाेते, त्यात बुधवारी अंशत: घट हाेत ४५.५ अंशाची नाेंद झाली. दुसरीकडे जिल्ह्यातील ब्रम्हपुरी अंशत: वाढून ४५.६ अंशासह जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर पाेहचले आहे. तिकडे अकाेल्याचाही पारा उसळत ४५ अंशावर पाेहचला आहे.तापमानाची घाेडदाैड इतर शहरातही कायम आहे. नागपूर २४ तासात अंशत: वाढून ४४.४ अंशावर उसळले. मात्र जाणीव ४५ अंश असल्यासारखी हाेती. तिकडे वर्धा ४४.७ अंश, अमरावती ४४.६ अंशापर्यंत वाढले आहे. मात्र यात धक्कादायक म्हणजे सर्वाधिक वनक्षेत्र असलेल्या गडचिराेलीचे तापमान ४४.६ अंशावर उसळले आहे. भंडारा, यवतमाळ, वाशिम ४३ अंशाच्या पार आहेत. गाेंदियात पारा ४२.५ अंशावर आहे.
प्रचंड वाढलेल्या तापमानाने नागरिकांची प्रचंड हाेरपळ हाेत आहे. उष्णतेमुळे काही नागरिकांचे मृत्यु झाल्याची माहिती आहे. दुपारनंतर रस्त्यावरील वर्दळही कमी झाली आहे. अशात सूर्याचा प्रकाेप पुढेही कायम राहणार असून २३ ते २६ एप्रिलपर्यंत उष्ण लाटांचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.