लाेकमत न्यूज नेटवर्क
ब्रिजेश तिवारी
लाेकमत न्यूज नेटवर्क
काेंढाळी : काेराेना संक्रमण राेखण्यासाठी शासनाने घेतलेले संचारबंदी, जमावबंदी व लाॅकडाऊनचे निर्णय याेग्य असले तरी या निर्णयांचा शेतकऱ्यांना जबर फटका बसला आहे. विविध भाजीपाल्याला शहर व ग्रामीण भागात मागणी असली तरी विक्री यंत्रणा काेलमडल्याने शेतकऱ्यांना शेतातील भाजीपाला फेकावा अथवा गुरांना खायला घालावा लागत आहे. हीच अवस्था दुग्धव्यवसायाची आहे.
काटाेल तालुक्यातील काेंढाळी व परिसरातील गावांमधील शेतकरी कपाशी, सोयाबीन, भुईमूग, गहू, हरभरा या परंपरागत पिकांसाेबत संत्री व माेसंबीचे तसेच विविध फुलांचे आणि भाजीपाल्याच्या पिकांचे माेठ्या प्रमाणात उत्पादन घेतात. काही शेतकरी शेतीला जाेडधंदा म्हणून दुग्धव्यवसायदेखील करतात. या भागातील बहुतांश शेतकरी त्यांच्याकडील भाजीपाला नागपूर, काटाेल, वर्धा जिल्ह्यातील कारंजा (घाडगे) या शहरात तसेच परिसरातील आठवडी बाजारात विकायला नेतात. काेराेना संक्रमण काळात या पिकांचा उत्पादनखर्च वाढला असून, तुलनेत उत्पन्न कमी झाल्याची माहिती अनेकांनी दिली. भाजीपाल्याला शहरात माेठी मागणी असतानाही भाजीपाला माेठ्या प्रमाणात शहरात विक्रीसाठी पाठविणे शक्य हाेत नसल्याने ही समस्या उद्भवल्याचे जाणकार शेतकऱ्यांनी सांगितले.
पंचायत समितीचे माजी उपसभापती याेगेश गाेतमारे हे या भागातील उत्कृष्ट भाजीपाला उत्पादकांपैकी एक आहेत. त्यांची खुर्सापार शिवारात शेती आहे. काेराेना संक्रमण काळात भाजीपाला उत्पादकांचे माेठे आर्थिक नुकसान हाेत असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. काेराेनाच्या दुसऱ्या लाटेत नुकसान हाेण्याचे प्रमाण वाढले आहे. टमाटर, वांगी, फुलकाेबी, पानकाेबी, भेंडी यासह भाजीपाल्याची अन्य पिके शहरातील व माेठ्या गावांमधील आठवडी बाजार बंद असल्याने विकणे शक्य हाेत नसल्याने ती फेकावी लागत आहे, असेही याेगेश गाेतमारे यांनी सांगितले. याच काळात दुधाची मागणी घटली असून, पशुखाद्याच्या किमती वाढल्या आहेत. त्यामुळे जनावरे जगवणे कठीण झाले आहे. बाजार बंद असल्याने गुरांना विकणेही शक्य हाेत नसल्याचे दूध उत्पादकांनी सांगितले.
...
आठवडी बाजार बंद
या भागातील बहुतांश शेतकरी त्यांच्याकडील भाजीपाला काेंढाळी, बाजारगाव, काटाेल, कारंजा (घाडगे) येथील आठवडी बाजारात विकायला नेतात. काेराेना संक्रमणामुळे प्रशासनाने बंदी घातल्याने आठवडी बाजार भरणे बंद झाले. भाजीपाला विक्रीची वेळी सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत ठरवून देण्यात आली आहे. या वेळेत दूरच्या गावांमध्ये माेठ्या प्रमाणात भाजीपाला विकणे शक्य हाेत नाही. हा संपूर्ण भाजीपाला काेंढाळी येथे विकणेही शक्य नाही, त्यामुळे भाजीपाला उत्पादकांची गाेची झाली आहे, अशी प्रतिक्रिया पंकज खोडणकर या भाजीपाला उत्पादकाने व्यक्त केली.
...
फूलशेती डबघाईस
काेराेना संक्रमणामुळे सर्व धार्मिक उत्सव, सण तसेच लग्नप्रसंग व सामाजिक कार्यक्रम पूर्णपणे बंद असल्याने फुलांची मागणी प्रचंड घटली आहे. त्यामुळे खुर्सापार, जुनापाणी, खापरी, जामगड या शिवारातील फूलशेती डबघाईस आली आहे. या भागातील काही शेतकऱ्यांनी माेठे कर्ज घेऊन ग्रीनहाउस व पाॅलिहाउसची निर्मिती केली आहे. फुलांची मागणी शून्यावर आल्याने कर्जाच्या व्याजाची परतफेड करणे कठीण झाले असल्याचे मंगेश खवसे, गुणवंत्त खवसे, अरविंद खवसे, उत्तम काळे, संजय किणेकर या फूल उत्पादकांनी सांगितले.