समाजाने शेतकऱ्यांना आधार द्यावा

By Admin | Updated: January 28, 2016 03:10 IST2016-01-28T03:10:12+5:302016-01-28T03:10:12+5:30

ऊन, पाऊस, वारा यांची अजिबात पर्वा न करता समाजाचे पोट भरण्यासाठी शेतीत झटणारा बळीराजाच आज अडचणीत सापडला आहे.

Society should support farmers | समाजाने शेतकऱ्यांना आधार द्यावा

समाजाने शेतकऱ्यांना आधार द्यावा

मोहन भागवत : ‘ऋणाधार’तर्फे १०० शेतकरी कुटुंबीयांना आर्थिक मदत
नागपूर : ऊन, पाऊस, वारा यांची अजिबात पर्वा न करता समाजाचे पोट भरण्यासाठी शेतीत झटणारा बळीराजाच आज अडचणीत सापडला आहे. कृषिप्रधान देशातील शेतकरीच समस्येत असेल तर हे दुर्दैवच आहे. शेतकऱ्यांना केवळ सरकारच मदत करेल या आशेवर न थांबता समाजाने पुढाकार घेऊन त्यांना आधार देण्याची आवश्यकता आहे. हे प्रत्येकाचे राष्ट्रीय कर्तव्यच आहे, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी व्यक्त केले. ‘ऋणाधार चॅरिटेबल ट्रस्ट’च्या वतीने १०० आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांना आर्थिक मदत करण्याच्या उपक्रमाला मंगळवारी सुरुवात झाली. दक्षिण अंबाझरी मार्गावरील बी. आर. मुंडले सभागृहात आयोजित या कार्यक्रमादरम्यान सरसंघचालकांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
आपल्या १२१ कोटीच्या देशात शेतकरी अनाथ असेल तर ते दुर्दैवच म्हणावे लागेल. समाजाने त्यांना आत्मविश्वास देण्याची गरज आहे. शहरातील परिवारांनी गावातील एक शेतकरी परिवार निवडावा आणि त्यांच्याशी संवाद साधत त्यांच्या सुखदु:खात सहभागी व्हावे, असे आवाहन डॉ.भागवत यांनी यावेळी केले. शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची ओढाताण पाहून त्यांच्या वेदनांवर फुंकर घालण्यासाठी शहरातील संवेदनशील व्यक्ती एकत्र आल्या व त्यातूनच ‘ऋणाधार ट्रस्ट’ची स्थापना झाली. या ‘ट्रस्ट’च्या माध्यमातून नागपूर व वर्धा जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त कुटुंबांचे सर्वेक्षण करण्यात आले. या कुटुंबांना एकरकमी मदत देण्याऐवजी या संस्थेने १०० कुटुंबांना दरमहा चार हजार रुपयांची आर्थिक मदत देण्याचा संकल्प केला. दर महिन्याला या कुटुंबाच्या जनधन योजनेंतर्गत काढलेल्या खात्यात ही रक्कम जमा करण्यात येणार आहे. २६ जानेवारी रोजी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते शेतकरी कुटुंबांना मदतीच्या ‘अंकुर’ या प्रकल्पाला प्रारंभ झाला व त्यांच्या हस्ते शेतकरी कुटुंबीयांना धनादेशांचे वितरण करण्यात आले.यावेळी नगरसेवक संदीप जोशी, उद्योजक अरुण लखानी, पराग सराफ, डॉ.प्रमोद गिरी, वृषाली देशपांडे, डॉ.मनोज सिंगरखिया, दयाल मुलचंदानी, दीपा काळे, प्रशांत दाणी प्रामुख्याने उपस्थित होते.(प्रतिनिधी)

शेतकरीपुत्रांना देणार कौशल्यपूर्ण शिक्षण

‘ट्रस्ट’तर्फे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांसाठी ‘अंकुश’ प्र्रकल्प उभारण्यात येतोय. या प्रकल्पाअंतर्गत शेतकऱ्यांच्या मुलांना कौशल्यपूर्ण शिक्षण देण्यात येईल. नागपुरात मुलांसाठी वसतिगृहे बांधण्यात येतील. तर शेतकऱ्यांच्या मुलीसांठी त्यांना पूरक असा व्यवसाय, रोजगार उपलब्ध करून देणार येईल. अशाप्रकारे शेतकऱ्यांच्या संपूर्ण कुटुंब सावरण्याचा प्रयत्न ‘ऋणाधार’ करणार असल्याची माहिती संस्थेचे उपाध्यक्ष संदीप जोशी यांनी दिली.

Web Title: Society should support farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.