श्रमिकांच्या आत्मसन्मानासाठी सामाजिक कार्यकर्ते राखणार उपवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:10 IST2021-04-30T04:10:38+5:302021-04-30T04:10:38+5:30
नागपूर : १ मे या कामगार दिनाचे औचित्य साधून जन आंदोलन संघर्ष समितीच्या पुढाकारात सूर्योदय ते सूर्यास्त असा एक ...

श्रमिकांच्या आत्मसन्मानासाठी सामाजिक कार्यकर्ते राखणार उपवास
नागपूर : १ मे या कामगार दिनाचे औचित्य साधून जन आंदोलन संघर्ष समितीच्या पुढाकारात सूर्योदय ते सूर्यास्त असा एक दिवसाचा उपवास राखण्याची घोषणा येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.
जन आंदोलन संघर्ष समितीचे विलास भोंगाडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकारचे भान जागविण्यासाठी आणि जनतेचे लक्ष श्रमिकांच्या समस्यांकडे वळविण्यासाठी हा उपक्रम आहे. सध्या कोरोनाच्या आपत्तीने देशात सर्वांना गर्भगळीत करून टाकले आहे. कोरोनाचा संसर्ग झपाट्याने पसरतो आहे. हॉस्पिटलमध्ये जागा नाही. ऑक्सिजन सिलिंडर अपुरे आहेत. औषधांचा साठा नाही. लसीकरणाच्या केंद्रावरून सरकारचे राजकारण चालले आहे. या संपूर्ण वर्षात आपत्तीशी लढण्यासाठी कार्यक्षम व्यवस्था उभारण्यात सरकार कमी पडले. यामुळे मोलकरीण (घरेलू कामगार), बांधकाम कामगार, शेतमजूर, हमाल, फेरीवाले, मच्छीमार, दलित-आदिवासी महिला श्रमिकांना लॉकडाऊनच्या काळात जगण्याच्या संकटाला सामोरे जावे लागत आहे. यामुळे श्रमिकांच्या आत्मसन्मानासाठी सूर्योदय ते सूर्यास्त या काळात महाराष्ट्रातील सामाजिक कार्यकर्ते डाॅ. बाबा आढाव, मेधा पाटकर, उल्का महाजन, सुभाष लोमटे, विलास भोंगाडे, चांदनकुमार, संजीव साने, प्रतिभा शिंदे यांच्यासह कार्यकर्ते उपोषण करणार असल्याचे विलास भोंगाडे यांनी कळविले आहे.