समाजनिर्मितीचा सेवायज्ञ
By Admin | Updated: February 23, 2015 02:21 IST2015-02-23T02:21:49+5:302015-02-23T02:21:49+5:30
समाजात अनेक संस्था आणि लोक समाजासाठी स्वत:ला झोकून देतात. अनेक लोक प्रसिद्धीचाही हव्यास धरत नाही. कामातून त्यांना मिळणारे समाधान हेच त्यांचे यश असते.

समाजनिर्मितीचा सेवायज्ञ
नागपूर : समाजात अनेक संस्था आणि लोक समाजासाठी स्वत:ला झोकून देतात. अनेक लोक प्रसिद्धीचाही हव्यास धरत नाही. कामातून त्यांना मिळणारे समाधान हेच त्यांचे यश असते. इतरांचे अश्रू पुसण्यात आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासारखे सुख नाही, हीच आपली संस्कृतीही सांगते.
यात रोटरी क्लब हे नाव अग्रगण्य आहे. आज रोटरी डे आहे. यानिमित्ताने रोटरीच्या विविध क्लबतर्फे करण्यात येणाऱ्या विविध सेवेतून समाज समृद्ध करण्याचाच प्रयत्न होतो आहे. पैसा मिळविणे कधीच वाईट नसते. पण पैसा सत्पात्री खर्च करण्यासाठी संस्कार आणि मनाचा मोठेपणा लागतो. सारे जग स्वार्थांधतेने भरलेले असताना काही लोक चांगली कामे करीत असतात. त्यांच्या कार्यात सातत्य असते आणि या कार्यातून अनेक गरजूंना जगण्याची प्रेरणा मिळते. त्यांच्या आयुष्यातले दु:ख कमी होते. रोटरीचे विविध क्लब व्रतस्थपणे हे कार्य गेल्या अनेक वर्षांपासून करीत आहेत. जेथे पैशांची गरज आहे तेथे पैसाही मोठ्या प्रमाणात उभा करीत आहे. पदरमोड करून आॅपरेशन थिएटर्स, आरोग्य शिबिरे, शस्त्रक्रिया करून देण्याचे काम रोटरीतर्फे करण्यात येत आहे.
आयुष्यभर एखादी शस्त्रक्रिया करण्यासाठी पैसा जमवू न शकणाऱ्या गरीब आणि दुर्गम भागातील रुग्णांवर शस्त्रक्रिया करून त्याचे आरोग्य सुधारण्याचा हा संकल्पच दैवी आहे, ईश्वरीय आहे. रोटरी हे काम करते आहे. सर्वच क्लब्सच्या कार्यावर एक नजर टाकली तर सहजपणे एक बाब जाणवते. प्रत्येक क्लब वेगवेगळ्या कार्यासह आरोग्य सेवेसाठी प्रामुख्याने झटत आहे. रोटरीमुळे दुर्गम भागात आज मोठे रुग्णालय बांधण्यात येत आहेत आणि आदिवासींना गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा मिळत आहे. याशिवाय नवी पिढी निर्माण करणे आणि त्यांना संवेदनशील बनविणे गरजेचे आहे. त्याशिवाय सेवेचा यज्ञ अखंड सुरू राहणार नाही. रस्त्यावर फिरणाऱ्या मुलांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देऊन त्यांना मदत करणे, त्यांच्यावर संस्कार करणे, त्यांच्या शिक्षणाचा खर्च उचलणे हे काम जवळपास प्रत्येक क्लबने उचलले आहे. त्यासाठी सर्व सदस्य पुढाकार घेत आहेत. याशिवाय विविध शाळांमध्ये संवाद समूह तयार करणे, नवीन कल्पनांवर काम करणे हे रोटरीचे काम आहे. या साऱ्याच प्रयत्नातून आपला समाज अधिक समृद्ध, निरोगी, निकोप आणि आनंदी करण्याचा हा संकल्प नक्कीच यशस्वी होईल, असा विश्वास रोटरियन्सना वाटतो, तो सार्थ आहे. रोटरीच्या कार्याचा हा आढावा घेण्याचा प्रयत्न...