तर विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवू : कवाडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2019 23:52 IST2019-08-06T23:51:11+5:302019-08-06T23:52:16+5:30
विखुरलेल्या रिपब्लिकन चळवळीमध्ये बंधूभाव निर्माण करण्याच्या उद्देशाने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकसंघपणे पुढील वाटचाल करण्यासाठी ‘रिपब्लिकन जनशक्ती महाआघाडी’ची स्थापना करण्यात आली आहे. निवडणुकीत राज्यातील धर्मनिरपेक्ष आघाडीमध्ये जागा वाटपात सन्मानजनक स्थान न मिळाल्यास रिपब्लिकन महाआघाडी स्वबळावर निवडणूक लढवेल, असा इशारा पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी दिला.

तर विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवू : कवाडे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विखुरलेल्या रिपब्लिकन चळवळीमध्ये बंधूभाव निर्माण करण्याच्या उद्देशाने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकसंघपणे पुढील वाटचाल करण्यासाठी ‘रिपब्लिकन जनशक्ती महाआघाडी’ची स्थापना करण्यात आली आहे. निवडणुकीत राज्यातील धर्मनिरपेक्ष आघाडीमध्ये जागा वाटपात सन्मानजनक स्थान न मिळाल्यास रिपब्लिकन महाआघाडी स्वबळावर निवडणूक लढवेल, असा इशारा पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी दिला.
दलित, आदिवासी, ओबीसी, भटके-विमुक्त, मागासवर्ग व अल्पसंख्यांक अशा वंचितांना एकसंघ करून वाटचाल करण्यासाठी ही महाआघाडी स्थापन करण्यात आली असून महाआघाडीचा जनशक्ती महामेळावा येत्या १७ ऑगस्ट रोजी नाशिक येथे हाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या महामेळाव्यात नानासाहेब इंदिसे, डॉ. राजेंद्र गवई, गंगाधर गाडे अशा सर्व रिपब्लिकनवादी नेत्यांना आमंत्रित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. पत्रपरिषदेला जयदीप कवाडे व इतर नेता उपस्थित होते.
काश्मीरचे स्वागत पण प्रक्रिया चुकीची
जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणाऱ्या ३७० कलम निरस्त करण्याच्या केंद्र शासनाच्या निर्णयाचे प्रा. कवाडे यांनी स्वागत केले. मात्र केंद्र शासनाने अवलंबलेली प्रक्रिया चुकीची असल्याची टीकाही त्यांनी केली. संविधानिक मार्गाचा अवलंब करून जम्मू काश्मीरची जनता व तेथील विधानसभेच्या मंजुरीने हे झाले असते तर योग्य झाले असते, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.