आंध्र प्रदेशातून गांजाची तस्करी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:07 IST2021-03-15T04:07:26+5:302021-03-15T04:07:26+5:30
दिल्लीला जाणारी खेप पकडली : बेलतरोडी पोलिसांची कारवाई लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : आंध्र प्रदेशातून गांजाची मोठी खेप घेऊन ...

आंध्र प्रदेशातून गांजाची तस्करी
दिल्लीला जाणारी खेप पकडली : बेलतरोडी पोलिसांची कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आंध्र प्रदेशातून गांजाची मोठी खेप घेऊन निघालेल्या एका तस्कराला बेलतरोडी पोलिसांनी शनिवारी रात्री ताब्यात घेतले. त्याच्याकडून ९२ किलो गांजा तसेच कार असा एकूण १८ लाख, ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. शिवशंकर यलया इसमपल्ली (वय २७) असे पोलिसांनी अटक केलेल्या गांजा तस्कराचे नाव आहे. तो हैदराबादचा रहिवासी आहे. बेलतरोडीचे ठाणेदार विजय आकोत आपल्या सहकाऱ्यांसह शनिवारी रात्री महामार्गावर गस्त करीत असताना त्यांना डीएल ४सी / एडीड ३६६५ क्रमांकाची शेवरलेट कार येताना दिसली. कार चालकाचे पोलिसांवर लक्ष जाताच तो विचलित झाला. त्यामुळे पोलिसांना संशय आला. पोलिसांनी कारचालक इसमपल्ली याला बाजूला थांबवून त्याची चौकशी केली. तो असंबद्ध उत्तर देत असल्यामुळे पोलिसांचा संशय बळावला. त्यामुळे त्यांनी कारची कसून तपासणी केली. कारच्या डिक्कमध्ये चोरकप्पा असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. तो उघडून बघितला असता आतमध्ये प्लास्टिकच्या चार पोत्यांमध्ये ९१ किलो, ५५६ ग्राम गांजा आढळले. त्यामुळे पोलिसांनी कारचालक आरोपी इसमपल्ली याला बेलतरोडी ठाण्यात आणले. तेथे त्याची चौकशी केली असता हैदराबादमधून गांजाची ही खेप दिल्लीला नेत असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. त्यामुळे त्याच्याविरुद्ध अमली पदार्थविरोधी कायद्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. जप्त करण्यात आलेल्या गांजाची किंमत १३ लाख, ७३ हजार, ३४० रुपये असून कारची किंमत ५ लाख रुपये आहे. पोलिसांनी आरोपीकडून १,२०० रुपये आणि मोबाईलही जप्त केला.
---
आंध्र प्रदेशला जाणार पोलीस पथक
अटक केली केलेल्या आरोपीने हा गांजा तसेच कार कुणाची, त्यांची नावे पोलिसांना सांगितली आहे. त्यामुळे त्यांना अटक करण्यासाठी बेलतरोडीचे पोलीस पथक हैदराबाद आणि दिल्लीला जाणार आहे. पोलीस आयुक्त अमितेशकुमार, अतिरिक्त आयुक्त डॉ. दिलीप झळके, उपायुक्त डॉ. अक्षय शिंदे, सहायक आयुक्त डॉ. नीलेश पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली बेलतरोडीचे ठाणेदार विजय आकोत यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक विकास मनपिया, हवलदार श्रीराम देवढे, रणधीर दीक्षित, अविनाश ठाकरे तसेच गोपाल देशमुख, मिलिंद पटले, प्रवीण जांभूळकर, मनोज शाहू, राकेश रुद्रकार, कुणाल लांडगे आणि नितीन बावणे यांनी ही कामगिरी बजावली.
----