स्मृती इराणींनी केला पदाचा गैरवापर
By Admin | Updated: January 24, 2016 03:05 IST2016-01-24T03:05:29+5:302016-01-24T03:05:29+5:30
हैदराबाद येथील केंद्रीय विद्यापीठ ही स्वायत्त संस्था आहे. त्यात मंत्र्यांना थेट कारवाई करण्याचा कुठलाही अधिकार नाही,

स्मृती इराणींनी केला पदाचा गैरवापर
पंतप्रधानांनी घ्यावा मंत्रिपदाचा राजीनामा : प्रकाश आंबेडकर यांची मागणी
नागपूर : हैदराबाद येथील केंद्रीय विद्यापीठ ही स्वायत्त संस्था आहे. त्यात मंत्र्यांना थेट कारवाई करण्याचा कुठलाही अधिकार नाही, असे असूनही मानव संसाधन मंत्री स्मृती इराणी यांनी त्या विद्यापीठातील कारभारात थेट हस्तक्षेप करीत आपल्या मंत्रिपदाचा गैरवापर केला आहे. कायद्याने हा गुन्हा असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्मृती इराणी यांचा तातडीने राजीनामा घ्यावा, अशी मागणी भारिप बहुजन महासंघाचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी येथे पत्रकार परिषदेत केली.
अॅड. प्रकाश आंबेडकर म्हणाले, हैदराबाद येथील केंद्रीय विद्यापीठ हे विद्यापीठ कायदा १९७४ अंतर्गत येते या कायद्यांतर्गत हे विद्यापीठ एक ‘अॅटोनॉमस बॉडी’ (स्वायत्त संस्था) आहे. या विद्यापीठाचे कुलगुरू नेमायचे असतील तर ते या देशातील राष्ट्रपतींद्वारे नेमले जातात. या विद्यापीठातील अभ्यासक्रम युजीसी ठरवित असते.
येथील सगळा व्यवहार येथील गव्हर्नन्स बॉर्डी मार्फत पाहिले जातात. स्मृती इराणी या मानव संसाधन मंत्री असल्या तरी त्यांना येथे थेट हस्तक्षेप करण्याचे अधिकार नाहीत. त्यांना विद्यापीठासंबंधी काही माहिती हवी असल्यास त्या युजीसीमार्फत मागवू शकतात. परंतु स्मृती इराणी यांनी एक नव्हे तर चारवेळा विद्यापीठाशी पत्रव्यवहार केलेला असून त्यात कारवाई करण्यास सांगितले आहे. त्यामुळे त्यांनी आपल्या पदाचा गैरवापर केला आहे.
रोहित वेमुला हा हुशार विद्यार्थी होता. दलित असूनही तो जनरल कॅटेगरीतूनच प्रवेश घेत होता. विद्यापीठात आंबेडकरी चळवळ फोफावू नये म्हणूनच त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. त्याच्यावर साामजिक बहिष्कार घालण्यात आला. त्यातून त्याने आत्महत्या केली. हा ब्रिलियन्सी किल करण्याचा प्रकार असल्याचेही त्यांनी सांगितले.
पत्रकार परिषदेला पक्षाचे ज्येष्ठ नेते नगरसेवक राजू लोखंडे, अॅड. मिलिंद पखाले, डॉ. संदीप नंदेशवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)
पाकिस्तानवर हल्ला करण्यास कुणी रोखले
पाकिस्तानला त्यांच्याच भाषेत उत्तर देण्याची भाषा करणाऱ्या भाजप व नरेंद्र मोदींना पाकिस्तानवर हल्ला करण्यास कुणी रोखले आहे, असा प्रश्न उपस्थित करीत पाकिस्तानला त्यांच्या देशात घुसून मारण्यासाठी प्रचंड राजकीय ताकद लागते. मंदिरातील पुजाऱ्याकडून हे काम होऊ शकत नाही, मंदिरातील पुजारी देशाचे संरक्षण काय करणार, अशी टीकाही अॅड. आंबेडकर यांनी केली.