ज्वेलर्समध्ये दरोडा घालणाऱ्यांच्या मध्य प्रदेशात बांधल्या मुसक्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:10 IST2021-07-07T04:10:09+5:302021-07-07T04:10:09+5:30
आठ तासात लावला छडा : उत्तर प्रदेशातील दरोडेखोर ताब्यात लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : सोमवारी भरदुपारी जरीपटक्यातील अवनी ज्वेलर्समध्ये ...

ज्वेलर्समध्ये दरोडा घालणाऱ्यांच्या मध्य प्रदेशात बांधल्या मुसक्या
आठ तासात लावला छडा : उत्तर प्रदेशातील दरोडेखोर ताब्यात
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सोमवारी भरदुपारी जरीपटक्यातील अवनी ज्वेलर्समध्ये पिस्तुलाच्या धाकावर दरोडा घालणाऱ्या टोळीचा नागपूर पोलिसांनी छडा लावला. मध्य प्रदेशातील कटनी येथे या दरोडेखोरांना पोलिसांनी जेरबंद केले.
जरीपटक्यातील भीम चौकाजवळ असलेल्या अवनी ज्वेलर्समध्ये चार दरोडेखोरांनी सोमवारी दुपारी २.१५ वाजता दरोडा घातला होता. पिस्तुलाचा धाक दाखवून सराफा व्यावसायिक आशिष नावरे यांना बेदम मारहाण करून दरोडेखोरांनी चार लाखांची रोकड, ६०० ग्राम सोने तसेच दहा किलो चांदी घेऊन पोबारा केला होता. अत्यंत वर्दळीच्या भागात भरदुपारी घडलेल्या या घटनेमुळे शहरभर खळबळ उडाली होती. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे दरोडेखोरांचा माग काढला. ते मनसर-देवलापार मार्गे मध्य प्रदेशमध्ये पळून गेल्याचा अंदाज येताच पोलिसांच्या पथकाने तिकडे धाव घेतली. मध्य प्रदेश पोलिसांनाही कळविले. त्यानुसार रात्रीच्या सुमारास कटनीजवळ दरोडेखोर पोलिसांच्या हाती लागले. ही टोळी उत्तर प्रदेशातील असल्याचे समजते. त्यांना नागपुरात आणण्याची प्रक्रिया वृत्त लिहिस्तोवर सुरू होती.
---