मुस्कानच्या चेहऱ्यावरील हास्य हरविले !

By Admin | Updated: June 25, 2015 03:04 IST2015-06-25T03:04:40+5:302015-06-25T03:04:40+5:30

मोमीनपुऱ्यात राहणाऱ्या १२ वर्षांच्या मुस्कानच्या पोटाला गंभीर दुखापत होऊन तिला ‘क्रोनिक कॅलसिफीक पॅक्रिटीटीस’ हा आजार जडला.

Smile faces smile! | मुस्कानच्या चेहऱ्यावरील हास्य हरविले !

मुस्कानच्या चेहऱ्यावरील हास्य हरविले !

नागपूर : मोमीनपुऱ्यात राहणाऱ्या १२ वर्षांच्या मुस्कानच्या पोटाला गंभीर दुखापत होऊन तिला ‘क्रोनिक कॅलसिफीक पॅक्रिटीटीस’ हा आजार जडला. आजीने घर घेण्यासाठी गोळा केलेले नऊ लाख रुपये तिच्या उपचारावर खर्च केले. परंतु मागील १५ दिवसांपासून पैशांअभावी मुस्कानची औषधी बंद आहे. हैदराबादला उपचारासाठी कसे न्यावे हा चिंतातुर करणारा प्रश्न तिच्या आाजीला भेडसावत आहे. त्यामुळे मुस्कानच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्यासाठी गरज आहे ती समाजातील दानदात्यांनी सढळ हाताने मदत करण्याची.
मुस्कान खान ही आपली आजी सलमा वारसी (५५), आई मुमताज परवीन खान आणि भावासोबत आजीकडे जामा मशीद जल्काउद्दीन चिल्ला मोमीनपुरा येथे राहते. मुस्कानच्या वडिलांनी त्यांना सोडून दिले अहे. नालसाहब चौक खदान येथील ब्ल्यू डायमंड इंग्लिश हायस्कूलमध्ये शिकत असताना २ मे २०१२ रोजी दुचाकीच्या चाकात दुपट्टा गेल्यामुळे मुस्कानचा अपघात होऊन तिच्या पोटाला गंभीर इजा झाली. मुस्कानची आजी सलमा वारसीने तिच्या उपचारावर नागपुरातील रुग्णालयात नऊ लाख रुपये खर्च केले. हैदराबादला जाण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिल्यावर तेथेही उपचारापोटी तीन ते चार लाख खर्च झाले. घर घेण्यासाठी गोळा केलेले सर्व पैसे खर्च झाले. सध्या मुस्कानच्या आजीजवळ तिच्या उपचारासाठी एकही पैसा नसल्यामुळे आणि घरात ती एकटीच कमावती असल्यामुळे ती हतबल झाली आहे. मुस्कानच्या उपचारासाठी आणखी १० लाखाचा खर्च अपेक्षित आहे. पैसे नसल्यामुळे मागील १५ दिवसांपासून मुस्कानची औषधीही बंद झाली आहे. त्यामुळे मुस्कानला या आजारातून बाहेर काढण्यासाठी आणि तिच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्यासाठी समाजातील दानदात्यांनी सढळ हाताने मदत करण्याची गरज आहे. त्यासाठी मुमताज परवीन खान यांच्या स्टेट बँक आॅफ इंडिया सेंट्रल एव्हेन्यू खाते क्रमांक २०२८३९७६०९१ मध्ये समाजातील दानशूर व्यक्ती, समाजसेवी संस्थांनी मदत करण्याचे कळकळीचे आवाहन मुस्कानची आजी सलमा वारसी यांनी केले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Smile faces smile!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.