स्मार्ट नाकाबंदीतून स्मार्ट वसुली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:48 IST2021-02-05T04:48:56+5:302021-02-05T04:48:56+5:30
नरेश डोंगरे लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर - वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करून पोलिसांना वाकुल्या दाखवणाऱ्या वाहनचालकांकडून थकीत चालान वसुली करण्यासाठी ...

स्मार्ट नाकाबंदीतून स्मार्ट वसुली
नरेश डोंगरे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करून पोलिसांना वाकुल्या दाखवणाऱ्या वाहनचालकांकडून थकीत चालान वसुली करण्यासाठी ‘स्मार्ट वसुली अभियान’ वाहतूक शाखेच्या पोलिसांनी सुरू केले आहे. विशेष म्हणजे, अवघ्या २० दिवसांत या अभियानातून चक्क १ कोटी २० लाखांची वसुली झाली आहे.
वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांना वाहतूक पोलीस दंडापोटी (तडजोड) शुल्क आकारतात. या शुल्क आकारणीच्या रोख स्वरूपाच्या प्रक्रियेतून ‘ऑन द स्पॉट मांडवली’ होत असल्याचे अनेक किस्से उघड झाल्याने दोन वर्षांपूर्वी नागपुरात ई चालान पद्धत अंमलात आली. नियम तोडून पळणाऱ्या वाहनचालकांना दंडाची पावती (ई चालान) त्यांच्या पत्त्यावर (घरी) पाठवण्यात येऊ लागली; मात्र त्यालाही हजारो वाहनचालकांनी वाकुल्या दाखवल्या. त्यामुळे अनपेड चालानची संख्या प्रचंड वाढली. नागपूर वाहतूक शाखेच्या पोलिसांचे चक्क १६ कोटी रुपये वाहनचालकांकडे थकीत झाले. हे कसे वसूल करावे, हा प्रश्न पोलिसांची डोकेदुखी वाढवत होता. पोलीस आयुक्त अमितेशकुमार आणि वाहतूक शाखेचे उपायुक्त सारंग आवाड यांनी त्यावर स्मार्ट तोडगा काढला. त्यानुसार, वाहतूक पोलिसांकडून १३ जानेवारीपासून शहरातील विविध भागात ‘स्मार्ट नाकाबंदी’ करण्यात येऊ लागली. प्रत्येक वाहतूक पोलिसांच्या मोबाईलमध्ये स्मार्ट अनपेड चालानची ॲप डाऊनलोड करण्यात आली. बारकोड असलेली नंबरप्लेट मोबाईलमध्ये फोटो काढून स्कॅन केल्यास त्यावर चालानची किती रक्कम थकीत (अनपेड) आहे, ते या ॲपमधून पोलिसांना तत्काळ कळते. त्यामुळे तिथल्या तिथे वाहनचालकाकडून वसुली करून त्याच्या हातात पावतीही ठेवणे सोपे जाते. २० दिवसांपूर्वी सुरू करण्यात आलेल्या या स्मार्ट नाकाबंदीतून पोलिसांचे आतापावेतो १ कोटी, २० लाख रुपये वसूल झाले आहेत. अत्यंत क्लिस्ट ठरलेल्या अनपेड चालानच्या वसुलीवर असा परिणामकारक तोडगा निघाल्याने वाहतूक शाखेच्या वसुलीची गाडी सुसाट धावत आहे.
----
५ ते ७ लाखांची रोज रिकव्हरी - उपायुक्त आवाड
स्मार्ट नाकाबंदी आणि स्मार्ट वसुलीच्या उपक्रमातून रोज ५ ते ७ लाखांची वसुली होते आहे. त्यामुळे आमच्या अनपेड चालानच्या १६ कोटींची वसुली अतिशय सहजपणे आम्ही लवकरच करू. या उपक्रमातून कुणा वाहनचालकाशी वाद होत नाही किंवा कुणाकडून आरोप होण्याचाही प्रश्न नसल्याचे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त सारंग आवाड यांनी लोकमतला सांगितले.
----