लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ग्राहकांना पूर्वसूचना न देता स्मार्ट प्रीपेड वीज मीटर बसवण्याच्या विरोधात विदर्भ राज्य आंदोलन समितीने सोमवारी वेरायटी चौकात आंदोलन केले. स्मार्ट मीटर, नकाे, प्रीपेड नको आणि टीओडीही नको अशी आक्रमक भूमिका घेत यावेळी स्मार्ट मीटरची प्रतिकृतीही जाळण्यात आली. स्मार्ट प्रीपेड मीटरचे नाव बदलून ‘टीओडी (टाईम ऑफ द डे) मीटर’ ठेवण्यामागे महावितरणचे एक प्रकारचे कटकारस्था असल्याची टीकाही यावेळी करण्यात आली.
समितीने आरोप केला की, हे मीटर कोणतेही कॅलिब्रेशन सर्टिफिकेट किंवा ओके टेस्टिंग रिपोर्ट न घेता बसवले जात आहेत. जिल्ह्यातील सुमारे १४.५ लाख वीज ग्राहकांना आधुनिकीकरणाच्या नावाखाली नवीन मीटर दिले गेले. आता फक्त उद्योजकांना फायदा व्हावा यासाठी हे मीटर काढून त्याऐवजी स्मार्ट प्रीपेड मीटर बसवले जात आहेत. या मीटरमुळे ग्राहकांचे वीज बिल वाढले आहे.
या आंदोलनात मुकेश मासुरकर, नरेश निमजे, गुलाबराव धांडे, अमूल साकुरे, गिरीश तितरमारे, हरिभाऊ पानबुडे, राहुल बंसोड, प्यारूभाई नौशाद हुसेन, सतीश शेंद्रे, रहमान शेख, गणेश शर्मा, योगिता आगासे, अण्णाजी राजेधर, रवींद्र भामोडे, रामेश्वर मोहबे, चंद्रशेखर पुरी, संगीता उके, राजेंद्र सतई, युसूफ खान, अरविंद मेश्राम आदी सहभागी झाले होते.
पोलिसांशी वाद, बस थांबवलीआंदोलन तीव्र झाल्यामुळे पोलिस आणि विदर्भवादी कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला. पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन आंदोलन शांत करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, काही कार्यकर्त्यांनी ‘आपली बस’ थांबवली. पोलिसांनी या कार्यकर्त्यांना सीताबर्डी पोलीस ठाण्यात नेले. काही तासांनी त्यांना सोडून देण्यात आले.