‘स्मार्ट’चे खापर नासुप्रवर
By Admin | Updated: January 30, 2016 03:08 IST2016-01-30T03:08:07+5:302016-01-30T03:08:07+5:30
केंद्र सरकारने जारी केलेल्या स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या २० शहरांच्या पहिल्या यादीत नागपूरला स्थान मिळाले नाही, याचे खापर आता नागपूर सुधार प्रन्यासवर फोडले जात आहे.

‘स्मार्ट’चे खापर नासुप्रवर
सत्तापक्ष व प्रशासनाचा अंदाज : कार्यक्षेत्राबाबत अधिकाऱ्यांमध्ये संभ्रम
नागपूर : केंद्र सरकारने जारी केलेल्या स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या २० शहरांच्या पहिल्या यादीत नागपूरला स्थान मिळाले नाही, याचे खापर आता नागपूर सुधार प्रन्यासवर फोडले जात आहे. नागपूर शहरात महापालिका व नासुप्र या दोन विकास संस्था आहेत. त्यामुळे महापालिकेच्या हद्दीत नासुप्र कसा विकास करणार, या मुद्यावर संभ्रम होऊन नागपूरचे गुण कमी झाले असावेत, असा अंदाज वर्तविला जात आहे. विशेष म्हणजे महापौर प्रवीण दटके यांनी एका शहरात दोन संस्था असल्यामुळे विकासावर प्रतिकूल परिणाम होत असल्याचे सूतोवाच केल्यामुळे येत्या काळात ‘स्मार्ट’मध्ये पत्ता कट झाल्याचा राग नासुप्रवर निघण्याची शक्यता आहे.
नासुप्र बरखास्त करा, अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून केली जात आहे. महापालिकेत सत्तापक्षात असलेल्या भाजपने तसा प्रस्तावही पारित केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ही मागणी पूर्ण करतील, अशी अपेक्षा होती. पण तसे झाले नाही. आता पुन्हा एकदा नासुप्र बरखास्तीची मागणी जोर धरण्याची शक्यता आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत महापालिकेने केंद्र सरकारला जो प्रस्ताव पाठविला होता त्यात एरिया बेस्ट डेव्हलपमेंट अंतर्गत पारडी, पुनापूर, भरतवाडा, नारा, नारी, वांजरा, मानेवाडा, बाबुलखेडा विकसित करण्याचा समावेश होता. हा सर्व भाग नासुप्रच्या ले-आऊट अंतर्गत येतो. संबंधित भाग अद्याप महापालिकेला हस्तांतरित झालेला नाही.
संभ्रमामुळेच टक्का घसरला
नागपूर : डीपीआरमध्ये याचा उल्लेख करण्यात आला होता. त्यामुळे नासुप्रच्या कार्यक्षेत्रात महापालिका विकास कामे कशी करणार, असा प्रश्न प्रस्तावाची तपासणी करणाऱ्या केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना पडला असावा व या संभ्रमामुळेच नागपूरचे गुण कमी झाले असावेत, असा अंदाज वर्तविला जात आहे. महापालिकेतील अधिकारी व पदाधिकारी तर ही बाब उघडपणे बोलून दाखवित असून नाचक्कीसाठी नासुप्रलाच जबाबदार ठरवित आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महापालिका डीपीआरमध्ये कुठे कमी पडली याची माहिती समोर येईल. त्यावेळी यासाठी नासुप्रच जबाबदार आहे की महापालिका, यासाठी आपली बाजू मांडण्यात कमी पडली हे स्पष्ट होईल.
सल्लागार बदलण्याची शक्यता
स्मार्ट सिटीचा प्रस्ताव सादर करण्यात सल्लागाराची (कन्सलटन्ट) भूमिका महत्त्वाची होती. आता नागपूरचा नंबर कटल्यामुळे सुधारित प्रस्ताव तयार करण्यासाठी सल्लागार बदलला जाईल, अशी शक्यता आहे. सल्लागाराने डीपीआर तयार करताना त्यात प्रत्येक बाबीचा योग्य खुलासा केला नसावा, असाही ठपका ठेवला जात आहे. त्यामुळेच जुन्या सल्ल्गार एजंसीला डच्चू देण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. (प्रतिनिधी)
नासुप्र बरखास्तीचा पाठपुरावा करू
शहरात नागपूर सुधार प्रन्यास व महापालिका अशा दोन विकास संस्था आहे. त्यामुळे शहराच्या विकासावर प्रतिकूल परिणाम होत आहे. शहरात दोन विकास संस्था नसाव्या असे आपले मत आहे. नासुप्र बरखास्त करण्याचा मागणीचा प्रस्ताव महापालिकेच्या सभागृहाने पारित केला होता. त्या प्रस्तावावर आम्ही कायम आहोत. यासाठी राज्य सरकारशी पत्रव्यवहार केला जाईल. स्मार्ट सिटीमध्ये सहभागी न होण्यासाठी कोणत्या त्रुटी राहिल्या याचा अभ्यास केला जाईल.
- प्रवीण दटके, महापौर
त्रुटी दूर करू
स्मार्ट सिटीच्या प्रस्तावात राहिलेल्या त्रुटी दूर केल्या जातील. दुसऱ्या टप्प्यात सादर केला जाणारा प्रस्ताव अचूक, परिपूर्ण व सुस्पष्ट असेल याची काळजी घेतली जाईल. त्यासाठी तयारी सुरू करण्यात आली आहे. ही स्पर्धा आहे. कुणाचा क्रमांक पहिले लागला तर कुणाचा नंतर लागेल.
-श्रावण हर्डीकर, आयुक्त मनपा