‘स्मार्ट सिटी’ साठी करा स्मार्ट सूचना
By Admin | Updated: August 11, 2015 04:08 IST2015-08-11T04:08:03+5:302015-08-11T04:08:03+5:30
स्मार्ट सिटी होण्यात सर्वसामान्यांचाही सहभाग असावा, यासाठी महापालिकेने आगळीवेगळी संकल्पना मांडली आहे.

‘स्मार्ट सिटी’ साठी करा स्मार्ट सूचना
नागपूर : स्मार्ट सिटी होण्यात सर्वसामान्यांचाही सहभाग असावा, यासाठी महापालिकेने आगळीवेगळी संकल्पना मांडली आहे. वेबसाईट सुरू करून यात लोकसहभाग वाढविण्याचा प्रयत्न चालविला आहे. तज्ज्ञांची समिती आलेल्या सूचनातून १० स्मार्ट सूचनांची निवड करणार आहे. यात सर्वाधिक चांगल्या सूचना करणाऱ्यांना शहराचे ब्रॅण्ड अॅम्बेसडर होण्याचा बहुमान मिळणार आहे.
स्मार्ट सिटी प्रकल्पात सर्वसामान्यांचा सहभाग वाढावा यासाठी मनपाने आयडिया चॅलेंज (संकल्पना स्पर्धा)आयोजित केली आहे. यात शहरातील नागरिक स्मार्ट सिटीसाठी योग्य सूचना करू शकतात. सूचना आॅनलाईन देण्याची सुविधा असून सोबतच मनपा मुख्यालय व झोन कार्यालयात ड्रॉप बॉक्स ठेवण्यात आल्याची माहिती महापौर प्रवीण दटके यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.
१२ ते २७ आॅगस्टदरम्यान सर्वसामान्य नागरिक आपल्या कल्पक सूचना देऊ शकतात. मनपा, नीरी, व्हीएनआयटी, नासुप्र व सामाजिक विद्यालयाच्या सहा सदस्यांची समिती चांगल्या २० सूचनांची निवड करणार आहे.
यातील सर्वाधिक उत्तम १० सूचनांची निवड केंद्र व राज्यस्तरावरील तज्ज्ञ करणार आहे. सर्वाधिक चांगल्या १० सूचना देणाऱ्यांना प्रत्येकी १० हजारांचा पुरस्कार दिला जाणार आहे. प्रथम पुरस्कार २५ हजारांचा असून सर्वव्यापी व सर्वंकष कल्पनांना इनक्युबेशन फंडच्या माध्यमातून सर्वतोपरी मदत केली जाणार आहे. (प्रतिनिधी)
संघटनांचे प्रस्ताव स्वीकारणार
शहरातील विविध संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक घेऊ न स्मार्ट सिटीसंदर्भात त्यांच्या कल्पना व सूचना जाणून घेणार आहोत. यात कोणत्याही स्वरूपाचा राजकीय हस्तक्षेप होणार नसल्याची माहिती दटके यांनी दिली.
स्मार्ट सिटीसाठी
येथे सूचना करा
४विशेष संकेत स्थळ -डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू डॉट स्मार्ट सिटी नागपूर कॉम
४झोन कार्यालयात ड्रॉप बॉक्स
४ई-मेल संपर्क स्मार्ट सिटी आयडिया अॅट द रेट जी मेल डॉट कॉम
रस्त्यांची सूचना नको
स्मार्ट सिटीसाठी अभिप्रेत असलेल्या सूचना स्वीकारल्या जातील. सामाजिक व शहर विकासाच्या दृष्टीने उपयुक्त सूचनांचा स्वीकार केला जाईल. यात रस्ते, पाण्याची पाईपलाईन अशा सूचनांचा विचार केला जाणार नाही, अशी माहिती अतिरिक्त उपायुक्त जयंत दांडेगावकर यांनी दिली.
स्वच्छतेत माघारल्याचा शोध घेणार
नागपूर शहराला स्वच्छतेच्या बाबतीत राष्ट्रीयस्तरावर २५६ वा क्रमांक मिळाला आहे. वास्तविक २००९ मध्ये नागपूर शहर २३९ क्रमांकावर होते. शहराची पिछेहाट का झाली, यामागील कारणांचा शोध घेणार असून याबाबत अधिकाऱ्यांकडून माहिती मागितल्याची माहिती दटके यांनी दिली.