स्थायी समिती अध्यक्षांच्या कक्षात काँग्रेस नगरसेवकांची नारेबाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:11 IST2021-08-21T04:11:32+5:302021-08-21T04:11:32+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : निधी वाटपात अन्याय झाल्याने संतप्त झालेल्या स्थायी समिती सदस्यांनी शुक्रवारी थेट स्थायी समिती अध्यक्षांच्या ...

स्थायी समिती अध्यक्षांच्या कक्षात काँग्रेस नगरसेवकांची नारेबाजी
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : निधी वाटपात अन्याय झाल्याने संतप्त झालेल्या स्थायी समिती सदस्यांनी शुक्रवारी थेट स्थायी समिती अध्यक्षांच्या दालनात घुसून अध्यक्ष मुर्दाबाद अशी घोषणाबाजी केली. अध्यक्षांच्या चेहऱ्यावर काळे फासलेले बॅनर झळकावत रोष व्यक्त केला. यामुळे काही वेळ मनपात गोंधळ व तणावाचे वातावरण होते.
स्थायी समिती सदस्यांनी अध्यक्षांच्या विरोधात अशा स्वरुपाचे आंदोलन करण्याची बहुधा ही अलीकडच्या काळातील पहिलीच घटना आहे. स्थायी समिती सदस्यांना त्यांचा प्रभागातील विकास कामांसाठी प्राधान्याने निधी दिला जातो, परंतु समिती सदस्य नेहा निकोसे यांना निधी दिला नाही. ज्या फाईल मंजूर केल्या त्या शीर्षकात निधीच नाही. यामुळे नेहा निकोसे, राकेश निकोसे यांनी प्रभागातील नागरिकांसह थेट स्थायी समिती अध्यक्ष प्रकाश भोयर यांच्या कक्षात धडक दिली. महापालिका कार्यालयाच्या परिसरात घोषणाबाजी करीत फेऱ्या मारल्या. प्रकाश भोयर यांच्याशी चर्चा करून निधी वाटपातील अन्याय दूर करण्याची मागणी केली. गोंधळ वाढल्याने सत्तापक्ष नेते अविनाश ठाकरे यांनी यात हस्तक्षेप करीत निधी वाटपातील अन्याय दूर करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलक शांत झाले. या आंदोलनात काँग्रेसच्या अन्य नगरसेवकांचा समावेश नव्हता.
...
निधीसाठी बसपाचे धरणे
दुर्बल घटकांसाठी तरतूद असलेल्या ३५.६९ कोटींचे वाटप समिती सदस्यांना विश्वासात न घेता सभापतींनी स्वत: केले. यात अनियमिता झाली आहे. याची चौकशी करण्यात यावी. यासाठी बसपाचे गटनेते जितेंद्र घोडेस्वार यांच्या नेतृत्वात मनपा आयुक्त कार्यालयापुढे धरणे आंदोलन केले. मागासवर्गीय वस्त्यांतील विकास कामांसाठी निधी न देता मर्जीतील कंत्राटदारांना निधी देण्यात आला. मागील चार वर्षांतील दुर्बल घटकांचा निधी अखर्चित आहे. या निधीची पळवापळवी सुरू आहे. याची चौकशी करण्यात यावी. अशी मागणी बसपाच्या नगरसेवकांनी केली. आंदोलनात जितेंद्र घोडेस्वार, झोन सभापती वंदना चांदेकर, नगरसेवक नरेंद्र वालदे, विरंका भिवगडे, मंगला लांजेवार, संजय बुर्रेवार, यांच्यासह युवा नेते चंद्रशेखर कांबळे व बसपा कार्यकर्ते सहभागी झाले होते. शिष्टमंडळाने विभागीय आयुक्तांनाही निवेदन दिले.
...
अशा आहेत मागण्या
-विकास कामासाठी समान निधी वाटप करावा.
-दुर्बल घटक समितीच्या निधी वाटपाची चौकशी करावी.
-कार्यादेश व निविदा झालेली कामे सुरू करावी.
-प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ दुर्बल घटकांना मिळावा.
-रमाई आंबेडकर घरकूल निधीचे वाटप करावे.
-अंबाझरी उद्यानातील डॉ. बाबासाहेब आंबेकर स्मारकांचे पुनर्निर्माण करावे.
...
निकोसे यांना निधी दिला : भोयर
स्थायी समिती सदस्य नेहा निकोसे यांना २ कोटींचा निधी दिला आहे. त्यातील १.५० कोटीच्या कामाची वर्कऑर्डर देण्यात आली. निधी वाटपात कोणताही अन्याय केला नाही, अशी माहिती स्थायी समिती अध्यक्ष प्रकाश भोयर यांनी दिली.