यंगिस्तानचा नारा, ‘सीएम’ है हमारा
By Admin | Updated: November 1, 2014 02:46 IST2014-11-01T02:46:07+5:302014-11-01T02:46:07+5:30
अवघ्या ४४ च्या वर्षी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणारे नागपूरचे सुपुत्र देवेंद्र फडणवीस यांच्या यशाचे ...

यंगिस्तानचा नारा, ‘सीएम’ है हमारा
नागपूर : अवघ्या ४४ च्या वर्षी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणारे नागपूरचे सुपुत्र देवेंद्र फडणवीस यांच्या यशाचे उपराजधानीतील तरुणाईने जोरदार ‘सेलिब्रेशन’ केले. तरुण पिढीवर त्यांचा किती प्रभाव आहे हे नागपुरातील चौकाचौकात पहायला मिळाले. तरुणाईशी ‘कनेक्ट’ होऊ शकणारा मुख्यमंत्री मिळाल्यामुळे युवकांमध्ये उत्साह दिसून येत होता. फडणवीस यांची कार्यपद्धती लक्षात घेता ते तरुणाईच्या समस्यांना सोडविण्यासाठी अग्रक्रमाने पुढाकार घेतील, ही आशा युवकांनी व्यक्त केली. फडणवीस यांच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत व ते नक्कीच यंगिस्तानचा विश्वास सार्थ ठरवतील, अशा प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या.
आव्हान मोठे
लहान वयातच आपल्यातील नेतृत्वगुणांची चुणूक दाखविणारे देवेंद्र हे आम्हा सर्व तरुणांना जवळचे वाटतात. त्यांचे वय लहान आहे म्हणून नव्हे तर त्यांची काम करण्याची पद्धत अन् समस्या सोडविण्यासाठी त्यांच्याकडून घेण्यात येणारा पुढाकार त्यांना इतरांपेक्षा वेगळे करतो. त्यांच्यासमोर राज्याची विस्कळीत झालेली घडी जुळविण्याचे आव्हान आहे व ते नक्कीच यात यशस्वी होतील यात शंकाच नाही.
-सचिन पांडे, विद्यार्थी
तरुणाईसाठी रोजगारनिर्मिती हवी
उपराजधानीत ज्याप्रमाणात अभियांत्रिकी तसेच इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या महाविद्यालयांचे पीक फोफावले आहे, त्याप्रमाणात उद्योग आलेले नाही. त्यामुळे नाईलाजाने आम्हाला मोठ्या शहरांकडेच जावे लागते. यामुळे कुटुंबव्यवस्थेवरदेखील परिणाम होत आहे. देवेंद्र यांनी नागपुरात जास्तीत जास्त उद्योग कसे येतील यासाठी मुख्यमंत्री म्हणून प्रयत्न करायला हवेत ही अपेक्षा आहे.
-अमित शर्मा, नोकरदार तरुण
भयमुक्त वातावरण हवे
काही वर्षांपूर्वी अतिशय सुरक्षित मानण्यात येणाऱ्या नागपुरसारख्या शहरात आता महिला व तरुणींच्या मनात १०० टक्के सुरक्षिततेची भावना राहिलेली नाही. शहरातील क्राईमचा ग्राफ वाढीस लागला आहे. मोठ्या चौकांमध्ये सीसीटीव्ही उपलब्ध नाहीत. मुख्यमंत्री या नात्याने कायदा व सुव्यवस्था स्थिती मजबूत करण्यासाठी ठोस व आश्वासक पावले देवेंद्र उचलतील, अशी आशा आहे.
-तेजश्री जोशी,
‘आयटी’ क्षेत्रातील तरुणी
शिक्षणप्रणालीत सकारात्मक बदल आणा
देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: शिक्षणक्षेत्राला जवळून अनुभवले आहे. त्यांनी नागपूर विद्यापीठाच्या विधीसभेचे काम पाहिले आहे. अनेक अभ्यासक्रम हे विद्यार्थ्यांना रोजगार मिळवून देण्यात सक्षम नाहीत हे ते जाणतात. शिवाय शिक्षणप्रणालीचा ऱ्हास कसा होत आहे यावरदेखील त्यांचा अभ्यास आहे. त्यामुळे मुख्यमंत्री या नात्याने कौशल्य व रोजगाराधिष्ठित शिक्षणप्रणाली निर्माण करण्यावर त्यांनी भर द्यावा. विद्यार्थ्यांचा कल संशोधनाकडे कसा वळेल यासाठी त्यांच्या सरकारने नवनवीन योजना सुरू कराव्यात
-हितेश डोर्लीकर, व्यावसायिक
संपर्कात रहावे
राज्याच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत आपल्या समस्या पोहोचविण्याची सामान्य कुटुंबातील तरुण क्वचितच हिंमत करतो. कारण आपले म्हणणे ऐकून घेतले जाईल का, अशी त्याच्या मनात शंका असते. देवेंद्र फडणवीस यांच्यावर मुख्यमंत्रिपदाची मोठी जबाबदारी असली तरी त्यांनी तरुणाईशी ‘कनेक्ट’ होणे सोडू नये. ज्याप्रमाणे जनता दरबार असतो, त्याचप्रमाणे तरुणाईला आपल्या समस्या मांडण्यासाठी वेगळा प्लॅटफॉर्म त्यांनी तयार करून द्यावा.
-नीलेश राऊत, विद्यार्थी