तीन हजार झाडांची कत्तल !
By Admin | Updated: June 5, 2015 02:34 IST2015-06-05T02:34:46+5:302015-06-05T02:34:46+5:30
उपराजधानीतील वाढते औद्योगिकरण व शहरीकरणाच्या नावाखाली झाडांची सर्रास कटाई केली जात आहे.

तीन हजार झाडांची कत्तल !
जीवन रामावत नागपूर
उपराजधानीतील वाढते औद्योगिकरण व शहरीकरणाच्या नावाखाली झाडांची सर्रास कटाई केली जात आहे. यात मागील पाच वर्षांत शहरातील सुमारे तीन हजार झाडांची कत्तल करण्यात आली आहे. त्याचा शहरातील पर्यावरणावर फार मोठा वाईट परिणाम होऊ लागला आहे.
विज्ञान व बुद्घिमत्तेच्या जोरावर प्रगतीची भरारी घेताना पर्यावरणाला दुय्यम ठरविले जात आहे. परंतु पर्यावरण हा जीवनाचा आधार आहे. त्यामुळे आज जागतिक पर्यावरण दिनानिमित्त शहरातील पर्यावरण सुरक्षित ठेवण्यासाठी प्रत्येकाने नवीन वृक्ष लावण्याची शपथ घेण्याची गरज आहे. पर्यावरण संरक्षणासाठी हाच सर्वात सोपा मार्ग आहे. जैवविविधता मानवाला अन्न, पाणी व निवारा अशा जीवनावश्यक वस्तू पुरविते. जैवविविधतेचा नाश हा पर्यावरणीय परिसंस्थांची उत्पादकता कमी करतो. त्यामुळे जैवविविधतेचे संगोपन करणे आवश्यक आहे. वृक्ष जैवविविधतेचा महत्त्वाचा भाग आहे. मनुष्यासह विविध सजीवांच्या सुरक्षेसाठी आज वृक्षारोपण ही प्राथमिक गरज आहे. हिरव्यागार झाडांमुळे शहरात चैतन्य निर्माण होते.
मात्र सध्याची जीवनशैली पर्यावरणाला बाधक ठरत आहे. उत्पादन व उपभोगाच्या पद्घतीमुळे पाणी, हवा व जमिनींचा अनिर्बंध वापर होत आहे. यामुळे अनेक वनस्पती व प्राण्यांच्या प्रजातींचे अस्तित्व धोक्यात आले आहे. भोगवादी व चंगळवादी जीवनशैलीमुळे पर्यावरणाची हानी होत आहे. मानवासह हवा, पाणी, माती, खडक, वनस्पती व प्राणी हे सर्व पर्यावरणाचे घटक आहेत. यात आपले शहर सुद्घा अंतर्भूत आहे. उपराजधानीत ७९.५८ एकर जागेत ४१ उद्याने विकसित केली आहेत. परंतु त्या उद्यानांची सुद्धा फार चांगली अवस्था नाही. नागपूर मध्य भारतातील सर्वात मोठे शहर आहे. येथून काहीच अंतरावर कन्हान व पेंच नदी असून, पश्चिमेला वर्धा व पूर्वेला वैनगंगा नदी आहे. पर्यावरणाचा विचार डोक्यात येताच प्रदूषणाचा प्रश्न पुढे उभा ठाकतो.
या प्रदूषणाच्या प्रकोपात अनेक पशुपक्ष्यांच्या प्रजाती नष्ट झाल्या आहेत. शिवाय २८७ प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. तज्ज्ञांच्या मते, पशुपक्ष्यांचा निवास नष्ट झाल्यास त्यांच्या प्रजातीही नष्ट होतात.