रोजगारासाठी कौशल्याचे प्रशिक्षण आवश्यक
By Admin | Updated: July 16, 2015 03:21 IST2015-07-16T03:21:25+5:302015-07-16T03:21:25+5:30
स्थानिक स्तरावर जास्तीत जास्त रोजगार उपलब्ध करून देणे, तसेच रोजगारासाठी आणि पर्यायाने स्थलांतर ...

रोजगारासाठी कौशल्याचे प्रशिक्षण आवश्यक
जागतिक युवा कौशल्य दिन : विभागीय आयुक्त अनुपकुमार यांचा विश्वास
नागपूर : स्थानिक स्तरावर जास्तीत जास्त रोजगार उपलब्ध करून देणे, तसेच रोजगारासाठी आणि पर्यायाने स्थलांतर थांबविण्यासाठी कौशल्य विकास योजनेचा निश्चितपणे फायदा होईल, असा विश्वास विभागीय आयुक्त अनुपकुमार यांनी व्यक्त केला. विभागीय आयुक्त कार्यालयातील सभागृहात बुधवारी जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कौशल्य विकास व उद्योजकता मंंत्रालयातर्फे कौशल्य विकास व उद्योजकता २०१५ हे नवे राष्ट्रीय धोरण म्हणून जाहीर करण्यात आले असून एक पथदर्शी प्रकल्प म्हणून राबविण्यात येणारी प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना देशभरात राबविण्याबाबत बुधवारी औपचारिकपणे जाहीर करण्यात आली. यानिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयातही कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव जोंधळे, उपायुक्त आप्पासाहेब धुळाज, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाचे उपसंचालक सुनील काळबांडे उपस्थित होते.
विभागीय स्तरावर युवकांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देण्यासाठी येत्या २१ जुलै रोजी टाटा ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांसोबत तसेच आयसीआयसीआय फाऊंडेशनच्या विदर्भ कौशल्य अकादमीसोबत चर्चा करण्यात येऊन जास्तीत जास्त मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. संघटित व असंघटित उद्योग क्षेत्रातील कामगारांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देण्यात येईल, असेही विभागीय आयुक्त अनुपकुमार यांनी सांगितले. यावेळी उद्योजकांचा विभागीय आयुक्तांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यात जेएसडब्ल्यूचे जनरल मॅनेजर एस.व्ही. रानडे, बी.जी. आचमारे, एम.बी. सुधाकर, महिंद्रा अॅण्ड महिंद्राचे प्रदीप झोटिंग, बिटा कॉम्प्युटरचे संदीप दारव्हेकर, स्पेस वुडचे गिरीश देशपांडे, केईसी इंटरनॅशनलचे आर.के. सूर्यवंशी, निदान टेक्नॉलॉजीचे तुषार मेश्राम, परशु खासगी आयटीआयचे मयुर याऊल , श्री सर्व्हिसेसचे योगेश नाडकर, एस.एस. फडके, प्रवीण गाढवे, नरेंद्र भुते यांचा समावेश होता. आप्पासाहेब धुळाज यांनी प्रस्ताविक केले. ज्ञानदेव गोस्वामी यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)