सहा दिवसात सहा हजार कोटींचे कलेक्शन

By Admin | Updated: November 17, 2016 03:14 IST2016-11-17T03:14:40+5:302016-11-17T03:14:40+5:30

केंद्र सरकारने ५०० आणि १००० च्या नोटा चलनातून बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर १० तारखेपासून बुधवारपर्यंत राष्ट्रीयीकृत,

Six thousand crores collection in six days | सहा दिवसात सहा हजार कोटींचे कलेक्शन

सहा दिवसात सहा हजार कोटींचे कलेक्शन

बँकेत रांगा कायमच : दोन दिवसात ५०० च्या नवीन नोटा येणार
नागपूर : केंद्र सरकारने ५०० आणि १००० च्या नोटा चलनातून बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर १० तारखेपासून बुधवारपर्यंत राष्ट्रीयीकृत, खासगी, नागरी अर्बन बँकांच्या ६०० पेक्षा जास्त शाखा आणि पोस्टाच्या विविध कार्यालयातून नागपुरात जवळपास सहा हजार कोटींपेक्षा जास्त जुन्या नोटांचे कलेक्शन झाल्याची अधिकृत माहिती आहे.
नागपुरातील १७ नागरी अर्बन बँकेच्या जवळपास ३००० पेक्षा जास्त शाखांच्या माध्यमातून १ हजार कोटी रुपये ग्राहकांनी जमा केले आहेत. ही आकडेवारी दिवसेंदिवस वाढतच आहे.(प्रतिनिधी)


बँक आॅफ महाराष्ट्रमध्ये २०० कोटी जमा
बँक आॅफ महाराष्ट्रचे उपमहाव्यवस्थापक विजय कांबळे यांनी सांगितले की, बँकेच्या नागपूर, भंडारा आणि गोंदिया येथील ६५ शाखांच्या माध्यमातून बँकेत सहा दिवसात २०० कोटींपेक्षा जास्त जुन्या नोटा जमा झाल्या आहेत. शिवाय ८० कोटींच्या जुन्या नोटा ग्राहकांना बदलवून दिल्या आहेत. बँकेतर्फे अमरावती आणि रायपूर झोनमध्ये नवीन चलनी नोटा पाठविण्यात येत आहे. लोकांनी बँकेतून १०० आणि ५० रुपयांच्या नोटा नेल्या, पण त्या बाजारात दिसत नाही. लोकांनी त्या नोटा चलनात आणाव्यात. दोन दिवसात ५०० रुपयांच्या नवीन नोटा बँकेत येणार आहे. त्यानंतर रांगा कमी होतील, असा विश्वास कांबळे यांनी व्यक्त केला.

बंद फर्मवर आयकर खात्याची नजर
अनेक ग्राहक बंद असलेल्या फर्मच्या खात्यात जुन्या नोटा भरत आहे. अशा खात्यावर आयकर खात्याची नजर आहे. ३० डिसेंबरनंतर या खात्याची चौकशी होण्याची शक्यता एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर व्यक्त केली. त्यांनी सांगितले की, सहा दिवस भरणा भरणारे जास्त आणि रक्कम काढणारे

कमी दिसून आले. एटीएममधून दरदिवशी मिळणारे अडीच हजार रुपये खर्चासाठी पुरेसे नाहीत. त्यामुळे अनेकांनी प्रारंभी धनादेशाद्वारे १० हजार रुपये बँकेतून काढले. ग्राहकांना बचत खात्यातून आठवड्यात २४ हजार आणि चालू खात्यातून ५० हजार रुपये काढता येणार आहे.

सर्व बँकांच्या शाखांमध्ये गर्दी
नागपुरात राष्ट्रीयीकृत, खासगी आणि पोस्टाच्या शाखांमध्ये ग्राहकांनी जुन्या नोटांचा भरणा केला. स्टेट बँक, पंजाब नॅशनल बँक, महाराष्ट्र बँक, बँक आॅफ इंडिया, बँक आॅफ बडोदा, युनियन बँक यासह अन्य बँका तसेच अ‍ॅक्सिस बँक, आयसीआयसीआय, कोटक महिन्द्र, आयडीबीआय या बँकांच्या शाखांमध्ये लोकांनी कोट्यवधींचा भरणा केला. सर्व बँकांचा विचार केल्यास सहा दिवसात सहा हजार कोटींपेक्षा जास्त जुन्या नोटा सर्व शाखांमध्ये जमा झाल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली. ३० डिसेंबरपर्यंत मुदत असल्यामुळे मोठे रक्कम भरणारे नंतर येतील, असे त्यांनी सांगितले.

Web Title: Six thousand crores collection in six days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.