सहा महिन्यापासून वृद्ध आई-वडील मुलाच्या शोधात
By Admin | Updated: November 13, 2015 02:47 IST2015-11-13T02:47:17+5:302015-11-13T02:47:17+5:30
अभ्यासात अतिशय हुशार असलेल्या मुलाच्या शोधात वृद्ध आई-वडील मागील सहा महिन्यांपासून पोलीस ठाण्याचा चकरा मारत आहेत.

सहा महिन्यापासून वृद्ध आई-वडील मुलाच्या शोधात
पोलीस ठाण्याच्या मारताहेत चकरा : पोलिसांनी साधले मौन
नागपूर : अभ्यासात अतिशय हुशार असलेल्या मुलाच्या शोधात वृद्ध आई-वडील मागील सहा महिन्यांपासून पोलीस ठाण्याचा चकरा मारत आहेत. परंतु पोलिसांच्या कार्यपद्धतीमुळे त्यांच्या हाती केवळ निराशा आली आहे. इतरांच्या मदतीसाठी सदैव तत्पर असलेले या वृद्ध दाम्पत्याना स्वत:च्या मुलाच्या शोधासाठी इतरांच्या मदतीची वाट पाहावी लागत आहे.
मोहननगर येथील जयप्रकाश चौरसिया यांना राष्ट्रीय सेवेसाठी प्रधानमंत्री कार्यालयातून प्रशस्तीपत्र मिळाले आहे. महाराष्ट्र पोलीस महानिदेशकांतर्फे प्रशंसापत्र आणि जिल्हा सैनिक कार्यालयातर्फे प्रशस्तीपत्र मिळाले आहे. महानगरपालिकेनेही त्यांना राष्ट्रीय सेवा रत्न पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. अशा या सेवाभावी व्यक्तीला आपल्या मानसिक रुग्ण असलेल्या मुलाला शोधण्यासाठी दिवस रात्र फिरावे लागत आहे. इतकेत नव्हे त्यांनी मुलाच्या शोधासाठी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला.
चौरसिया यांनी लोकमतशी बोलताना सांगितले की, त्यांचा मुलगा अखिल चौरसिया हा व्हीएसपीएम कॉलेज नागपूर येथून फिजियोथेरेपीचा कोर्स करीत आहे. ९ वी व १० वीत त्याने चांगले गुण घेतले. अकरावीमध्ये शरीररचना विषयात चांगले गुण घेतले परंतु द्वितीय वर्षात मात्र तो या विषयात उत्तीर्ण होऊ शकला नाही. त्यामुळे त्याची मानसिक स्थिती बिघडली. त्याचा उपचार सुरु होता. २००८ पासून तो औषध घेत आहे. तो जेव्हाही घरून बाहेर जायचा वडिलांना सांगून जात असे. परंतु १२ मे २०१५ रोजी तो घरून बाहेर पडला तेव्हा त्याच्याजवळ ना मोबाईल होता ना औषध. लगेच परत येतो असे सांगून तो गेला, तेव्हापासून तो परतलाच नाही. पोलिसात तक्रार केली. परंतु काहीच कारवाई झाली नाही.
दर दोन दिवसांनी ते पोलीस ठाण्यात जाऊन विचारपूस करतात, परंतु सहा महिने लोटूनही मुलाचा पत्ता लागलेला नाही. (प्रतिनिधी)
उपोषणाचा इशारा
पोलिसांनी त्यांच्या मुलाला शोधण्यासाठी कुठलेही विशेष प्रयत्न केले नाहीत. त्यांच्या मुलाला शोधण्यासाठी येत्या सात दिवसात ठोस पाऊल उचलले नाही, तर उपोषणावर बसण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.