सहा महिन्यात पर्यायी शहर बससेवा
By Admin | Updated: December 3, 2014 00:39 IST2014-12-03T00:39:53+5:302014-12-03T00:39:53+5:30
स्टार बसचा खालावत चाललेला दर्जा, कमी होत चाललेल्या फेऱ्या व यामुळे होणारी प्रवाशांची गैरसोय विचारात घेता येत्या सहा महिन्यात अतिरिक्त पर्यायी शहरबस सेवा सुरू करण्यासाठी नव्या आॅपरेटरची

सहा महिन्यात पर्यायी शहर बससेवा
परिवहन समिती मांडणार अर्थसंकल्प : बंडू राऊत यांची सभापतिपदी फेरनिवड
नागपूर : स्टार बसचा खालावत चाललेला दर्जा, कमी होत चाललेल्या फेऱ्या व यामुळे होणारी प्रवाशांची गैरसोय विचारात घेता येत्या सहा महिन्यात अतिरिक्त पर्यायी शहरबस सेवा सुरू करण्यासाठी नव्या आॅपरेटरची नियुक्ती केली जाईल, अशी घोषणा परिवहन समितीचे नवनियुक्त सभापती सुधीर ऊर्फ बंडू राऊत यांनी केली.
परिवहन समितीच्या सभापतिपदी बंडू राऊत यांची मंगळवारी अविरोध निवड झाली. जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा पीठासीन अधिकारी म्हणून बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. सत्तापक्ष नेते कार्यालयात झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात महापौर प्रवीण दटके, स्थायी समितीचे अध्यक्ष बाल्या बोरकर यांनी राऊत यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. या वेळी बोलताना राऊत म्हणाले, वंश निमयतर्फे ४५० पैकी फक्त २०० बस चालविल्या जात आहेत. यातील काही बस मेन्टेनन्स अभावी रस्त्यातच बंद पडतात. काही बसवर आरटीओतर्फे कारवाई केली जाते. असेच सुरू राहिले तर भविष्यात या बसची संख्या १५० वर येण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत ३० लाखावर लोकसंख्या असलेल्या नागपूर शहरात सार्वजनिक परिरवहन व्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल. यावर उपाय म्हणून अतिरिक्त पर्यायी बस सेवा सुरू करण्यासाठी नवा आॅपरेटर सहा महिन्यात नियुक्त केला जाईल. यासाठी आवश्यक ती कायदेशीर प्रक्रिया लवकरच पूर्ण केली जाईल. यामुळे भविष्यात नागपूरकरांना आरामदायी व नियमित बससेवा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
परिवहन समिती या वर्षीपासून स्वत:चा अर्थसंकल्प सादर करेल, असेही त्यांनी सांगितले. समितीसाठी एक स्वतंत्र अकाऊंट आॅफिसर देण्याची मागणी प्रशासनाकडे करण्यात आली होती. पण ती पूर्ण झाली नाही. या वेळी ही मागणी पूर्ण करून घेतली जाईल. परिवहन समितीच्या अर्थसंकल्पात तिकीटाद्वारे येणारे उत्पन्न, बस संचालनावर होणारा खर्च, प्रवाशांना दिली जाणारी विविध प्रकारची सूट आदी बाबींचा लोखाजोखा मांडला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. परिवहन समितीवर महापालिकेतर्फे एका अधिकाऱ्याची नियुक्ती केली जाते. सध्या या समितीवर परिवहन व्यवस्थापक म्हणून उपायुक्त संजय काकडे हे सदस्य आहेत. मात्र, या समितीवर असणाऱ्या अधिकाऱ्याकडे इतर कुठलेही काम असू नये, अशी तरतूद आहे. या तरतुदीनुसार समितीवर असलेल्या अधिकाऱ्याकडे इतर जबाबदाऱ्या देऊ नये, अशी सूचना त्यांनी प्रशासनाला केली. (प्रतिनिधी)