गुन्हेगारांच्या सहा टोळ्या मकोकाच्या यादीत
By Admin | Updated: January 30, 2016 03:04 IST2016-01-30T03:04:21+5:302016-01-30T03:04:21+5:30
गुन्हेगारांनी मान झुकवून फिरावे, चांगले कामधंदे करावे. कॉलर टाईट करून आपल्या साथीदारांसह तो फिरत असेल, ...

गुन्हेगारांच्या सहा टोळ्या मकोकाच्या यादीत
पोलिसांचा अॅक्शन प्लॅन : शंभरावर गुंड टप्प्यात
नरेश डोंगरे नागपूर
गुन्हेगारांनी मान झुकवून फिरावे, चांगले कामधंदे करावे. कॉलर टाईट करून आपल्या साथीदारांसह तो फिरत असेल, खंडणी उकळत असेल, नागरिकांमध्ये दहशत निर्माण करीत असेल तर त्याची खैर नाही, पोलीस आयुक्त शारदा प्रसाद यादव यांचा हा खणखणीत इशारा उपराजधानीतील गुंड, सफेदपोश खंडणीखोरांसाठी आहे. तीन दिवसात तीन मोठ्या गुंडांच्या टोळ्यांविरुद्ध मकोकाची कारवाई करून शहर पोलिसांनी गुन्हेगारांमध्ये खळबळ उडवून दिली आहे. कुण्या एखाद्या शहरात तीन दिवसात तीन प्रमुख गुंडांच्या टोळ्यांवर मकोका सारखी सलग कठोर कारवाई करण्याचा हा ‘रेकॉर्ड’ महाराष्ट्रात नागपूर पोलिसांनी नोंदवला आहे. या पार्श्वभूमीवर, पोलीस आयुक्त यादव यांच्याशी प्रस्तुत प्रतिनिधीने चर्चा केली. आयुक्त म्हणाले, गुन्हेगारांचा सफाया करून उपराजधानीला ‘सेफ सिटी’ बनविण्यासाठी शहर पोलिसांनी बनविलेल्या ‘स्पेशल अॅक्शन प्लान’चा पहिला टप्पा म्हणजेच तीन टोळ्यांवर लावण्यात आलेला ‘मकोका’ होय. दुसऱ्या टप्प्यात आणखी तीन टोळ्यांवर मकोकाच्या कारवाईची प्रक्रिया पूर्णत्वास नेली जाणार आहे. तत्पूर्वीच्या कायदेशीर बाबी तपासण्याची आणि त्यातील उणिवा दूर करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
प्रत्येकाची कुंडली तयार
नागपूर : पुरेसा वेळ खर्ची घालून ‘स्पेशल अॅक्शन प्लान’ तयार करण्यात आला. त्यात शहरात किती गुंड सक्रिय आहेत, कोण कुठल्या टोळीत आहेत, कोण मालमत्तेवर कब्जा करतो, कोण खंडणी वसूल करतो, कोण दंगे करतो, कोण लुटमार करतो अन् कोण दुखापतीचे (बॉडी अफेन्स) गुन्हे करतो, त्याची स्वतंत्र यादी बनविण्यात आली. कोणत्या गुन्हेगारावर कोणते गुन्हे आहेत, त्याचा चार्ट तयार केल्यानंतर गुन्हेगारांवर नजर ठेवण्यात आली.
त्यानंतर अॅक्शन प्लान सुरू झाला. प्रारंभी तडीपार, नंतर स्थानबद्धता आणि आता मकोकाचा दणका देण्यात आला. गेल्या वर्षभरात मकोकाची एकूण १२ प्रकरणे झाली. त्यात ८० आरोपी होते. यावर्षीच्या पहिल्या महिन्यातील २९ दिवसातच तीन मोठ्या गुन्हेगारी टोळ्यांचे म्होरके आणि टोळ्यांमधील २३ गुंडांवर मकोका लावून नागपूर पोलिसांनी नवाच ‘रेकॉर्ड’ बनविला आहे. पोलिसांच्या आक्रमकतेमुळे गुन्हेगारी वर्तुळाचे धाबे पुरते दणाणले आहे. सर्वसामान्य जनता आश्वस्त होऊ पाहात आहे.
ही चांगली बाब आहे. मात्र, आम्ही एवढ्यावर थांबणार नाही, असे सांगून पोलीस आयुक्त म्हणतात, शहरातील ‘टॉप टेन गँग’ आणि त्यातील शंभरावर गुंड पोलिसांच्या यादीत आहेत. पुढच्या तीन ते चार आठवड्यात आणखी तीन टोळ्यांमधील गुंडांवर मकोकाच्या कारवाईची कागदोपत्री पूर्तता बघायला मिळणार आहे... आप देखते रहिये...!(प्रतिनिधी)
इन्टेन्शन क्लियर है !
प्रचंड आत्मविश्वासाने पोलीस आयुक्त सांगतात की, गुन्हेगारांना (पूर्वी ज्यांच्या हातून गुन्हे घडले, त्यांना) शहरात राहायचे असेल तर त्यांनी मान खाली घालून राहण्याची सवय लावावी. आधी गुन्हे केले, त्याचे भांडवल करून दहशत निर्माण करण्याचा कुणी गुंड प्रयत्न करीत असेल, सर्वसामान्यांना वेठीस धरत असेल, नागरिकांच्या जानमालाला धोका निर्माण करीत असेल आणि हे सर्व करताना वरून ‘टाईट कॉलर‘ने समाजात वावरत असेल तर, त्याची नांगी ठेचण्यासाठी पोलीस सज्ज आहेत.
टॉप टू बॉटम फ्री हॅण्ड
शहरातील कितीही मोठा गुन्हेगार असो, त्याच्या मुसक्या बांधताना कसलीही गय करायची नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीच जाहीररीत्या पोलीस आयुक्तांना सांगितले आहे. दुसरीकडे पोलीस महासंचालक (डीजी) प्रवीण दीक्षित यांच्याकडूनही नागपुरातील गुन्हेगारी चिरडून काढण्यासाठी पुरती मोकळीक आहे. पोलीस आयुक्तांनी उपराजधानीतील गुन्हेगारी आणि अवैध धंदे करणारांना वठणीवर आणण्यासाठी प्रत्येक पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्याला ‘फ्री हँण्ड‘ दिला आहे. गुन्हेगारांची गय करू नका, काही अडचण आल्यास मला सांगा, असे आयुक्तांनी सांगून ठेवल्यामुळे आता आता चौथ्या मकोकाची पुढच्या काही दिवसात घोषणा होणार आहे.
रेकॉर्ड नाही ट्रेलर
सुरक्षित आणि सभ्यपणे जगण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. या अधिकाराचे हनन करणारांना त्यांची जागा दाखविण्याची आम्ही पोलिसांनी तयारी केली आहे. त्याचमुळे तीन दिवसात तीन टोळ्यांवरील मकोकाचा रेकॉर्ड नागपूर पोलिसांनी बनविला असला तरी तो आमच्या योजनेनुसार ‘ट्रेलर’ आहे. पिक्चर आणखी बाकी असल्याचेही आयुक्त स्पष्ट करतात. पिक्चरच्या पुढच्या भागात ‘सफेदपोश‘ कंपनी आहे. त्यात बुकी आहेत, त्यांच्यावर हात ठेवणारे आहेत, दलाल आहेत, मांडवली करणारे आहेत अन् गुन्हेगार तसेच पोलिसांच्या मध्ये समेट घडवून आणणारेही आहेत. पुढची तीन मोकांची प्रकरणे सोनेगाव, प्रतापनगर आणि अन्य एका ठाण्याशी संबंधित आहे.