उत्तर प्रदेशात आंबेडकरी आंदोलनाची परिस्थिती निराशाजनक
By Admin | Updated: December 13, 2015 03:02 IST2015-12-13T03:02:33+5:302015-12-13T03:02:33+5:30
उत्तर प्रदेशात आंबेडकरी आंदोलनाची परिस्थिती निराशाजनक झाली आहे, असे ज्येष्ठ पत्रकार व साहित्यिक कंवल भारती यांनी सांगितले.

उत्तर प्रदेशात आंबेडकरी आंदोलनाची परिस्थिती निराशाजनक
कंवल भारती यांचे मत : एस. सी. एस. व्याख्यानमाला
नागपूर : उत्तर प्रदेशात आंबेडकरी आंदोलनाची परिस्थिती निराशाजनक झाली आहे, असे ज्येष्ठ पत्रकार व साहित्यिक कंवल भारती यांनी सांगितले. ते एस. सी. एस. व्याख्यानमालेत ‘आंबेडकरी आंदोलन आणि उत्तर प्रदेशचे वास्तव’ विषयावर बोलत होते.
भारतीय रिपब्लिकन पक्षामध्ये सुरुवातीला चांगले नेते होते. सर्वत्र भारावलेले वातावरण होते. बुद्धप्रिय मौर्य व संघप्रिय गौतम हे दोन नेते आंबेडकरी आंदोलनातील शेर होते. त्यांच्या एका आवाजावर लाखो दलित एकत्र येत होते. परंतु प्रति-क्रांतीने आंबेडकरी आंदोलनाचा प्रभाव कमी केला. बुद्धप्रिय मौर्य यांना काँग्रेसने तर, संघप्रिय गौतम यांना भाजपाने ओढून घेतले.
हे दोघेही आज कोठे आहेत, हे कोणालाही माहीत नाही. त्यांच्या आवाजावर १० लोकही जमण्याची परिस्थिती सध्या नाही. रिपब्लिकन पक्षाच्या या कमकुवतपणाचा लाभ कांशीराम यांच्या बहुजन समाज पक्षाने घेतला होता. परंतु सत्ता व मते मिळविण्यासाठी त्यांनीही आंबेडकरी आंदोलनाला मोठे केले नाही, अशी खंत भारती यांनी व्यक्त केली.
सध्या समाजात आमुलाग्र वैचारिक परिवर्तन झाले आहे. त्यासोबतच समाजात आंबेडकरी आंदोलनाबाबत संभ्रमही निर्माण झाला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष इत्यादी पक्ष आपापल्या चष्म्यातून आंबेडकरी आंदोलनाकडे पाहात आहेत. यामुळे आंबेडकरी आंदोलनाचे प्रचंड नुकसान होत आहे, याकडे भारती यांनी लक्ष वेधले.कांशीराम यांनी मायावती यांना मुख्यमंत्री करण्यासाठी भाजपासोबत गठबंधन केले होते. भाजपा सांप्रदायिक पक्ष नाही, असे जाहीर मतप्रदर्शन त्यांनी केले होते. याचा फटका आंबेडकरी आंदोलनाला बसला. याशिवाय मायावती जातीनिहाय संमेलने आयोजित करीत आहेत. बाबासाहेबांना जात नष्ट करायची होती, परंतु मायावती जातींना बळ देत आहेत.
परिणामी प्रत्येक जातीतील नागरिक स्वत:चे भले करण्यासाठी वेगवेगळ्या पक्षांसोबत जात आहेत. त्याचा वाईट परिणाम आंबेडकरी आंदोलनावर पडलाय. शत्रूंना ओळखल्याशिवाय दलितांचा विकास होऊ शकत नाही, असे मत भारती यांनी व्यक्त केले.संत चोखामेळा समाज मुलींची शिक्षण संस्थेतर्फे पाचपावलीतील एस. सी. एस. शाळेच्या प्रांगणात ही तीन दिवसीय व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे. व्याख्यानमालेचा आज पहिला दिवस होता. संस्थेचे अध्यक्ष प्रा. रणजित मेश्राम अध्यक्षस्थानी तर उपाध्यक्ष व्ही. टी. चिकटे, एस. डी. सूर्यवंशी, सचिव पवन गजभिये, अधीक्षक प्रा. भाऊ लोखंडे, सदस्य श्याम कांबळे, प्राचार्या मंगला पाटील व्यासपीठावर उपस्थित होते.(प्रतिनिधी)