मृतदेहाशेजारी बसून पाहिला आंबटशौकिनांनी सिनेमा
By Admin | Updated: April 2, 2017 02:42 IST2017-04-02T02:42:34+5:302017-04-02T02:42:34+5:30
अश्लील चित्रपट बघताना हृदयविकाराचा झटका येऊन एका निवृत्त शासकीय कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला.

मृतदेहाशेजारी बसून पाहिला आंबटशौकिनांनी सिनेमा
विजय टॉकीजमधील घटना : लक्षात आल्यानंतरही बाजूच्यांचे दुर्लक्ष
नागपूर : अश्लील चित्रपट बघताना हृदयविकाराचा झटका येऊन एका निवृत्त शासकीय कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. विजय टॉकीजमध्ये शनिवारी दुपारी ४ च्या सुमारास ही घटना घडली. विशेष म्हणजे, त्याच्या मृतदेहाशेजारी बसून आंबटशौकिनांनी सिनेमा बघितला.
मृत व्यक्ती निवृत्त सरकारी कर्मचारी होता. गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत तो दुपारी ३ च्या सुमारास तन मन धन हा चित्रपट बघायला गेला होता. सिनेमा बघताना त्याला हृदयविकाराचा झटका आल्याने तो खुर्चीवरून खाली कोसळला. मात्र, त्याच्या आजूबाजूची मंडळी नको ती दृश्य बघण्यात गुंंग असल्याने त्याच्याकडे कुणी लक्षच दिले नाही.
दुपारी ४.३० च्या सुमारास मध्यंतर झाल्यानंतर त्याच्या आजूबाजूच्या आंबटशौकीन प्रेक्षकांना तो निपचित पडून दिसला. काही जणांनी दारूच्या नशेत पडून असावा, असे समजून त्याला ओलांडले तर, जाण्या-येण्याला अडसर होत असल्यामुळे त्याला काही जणांनी उठविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याच्याकडून कसलाही प्रतिसाद मिळत नसल्याचे पाहून प्रेक्षकांतील काहींनी चित्रपटगृहाच्या कर्मचाऱ्यांना त्याची माहिती दिली. दरम्यान, पुन्हा सिनेमा सुरू झाला. कर्मचाऱ्यांनी जवळ येऊन बघितले तेव्हा तो व्यक्ती मृत झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. तशाही अवस्थेत चित्रपट बघण्यात आंबटशौकीन प्रेक्षक गुंग होते. माहिती कळताच गणेशपेठ पोलीस तेथे पोहोचले. त्यांनी चित्रपटगृहातून त्या व्यक्तीचा मृतदेह बाहेर काढला. तो मेयोत पाठविला. मोबाईल आणि ओळखपत्रावरून त्याची ओळख पटल्यानंतर त्याच्या नातेवाईकांना माहिती देण्यात आली. त्यानंतर नातेवाईक पोहोचले. पोलिसांनी याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली. चित्रपटगृहात पहिल्यांदाच अशी घटना घडल्याचे व्यवस्थापकांनी पोलिसांना सांगितले.(प्रतिनिधी)