त्या बहिणीला दुसºया भावाची मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2017 01:24 IST2017-10-09T01:24:00+5:302017-10-09T01:24:11+5:30
दोन्ही किडन्या निकामी झालेल्या व हृदयाचा गंभीर आजार असलेल्या बहिणीवरील उपचारासाठी भावाने कर्ज काढून उपचार केले, परंतु उपचाराचा खर्च वाढतच गेल्याने भाऊच कर्जबाजारी झाला....

त्या बहिणीला दुसºया भावाची मदत
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दोन्ही किडन्या निकामी झालेल्या व हृदयाचा गंभीर आजार असलेल्या बहिणीवरील उपचारासाठी भावाने कर्ज काढून उपचार केले, परंतु उपचाराचा खर्च वाढतच गेल्याने भाऊच कर्जबाजारी झाला तरीही बहिणीच्या उपचारासाठी तो दारोदारी फिरतोय. समाजाचे आर्थिक पाठबळ मिळाल्यास बहीण वाचेल, तिच्या मुलांना, घराला मोठा आधार मिळेल, या एकमेव आशेवर तो आहे. या संदर्भातील वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध करताच असंवेदनशीलतेचा आरोप झेलणाºया याच समाजातून आकाश हरिदास सरोदे यांनी त्या भावापुढे मदतीचा हात सरसावला. २५ हजाराचा धनादेश दिला.
घरात आधीच दारिद्र्य त्यात नाहिद अंजूम कुरेशी (३२) रा. गड्डीगोदाम हिला काही कळण्याच्या आतच कठोर आघात सोसण्याची वेळ आली. भाऊ साजीद अंजूम तिच्या उपचारासाठी काही करण्याची जिद्द बाळगून आहे. परंतु दारिद्र्य आड येत असल्याने त्याचे प्रयत्न थिटे पडत आहे. ‘लोकमत’ने ‘मदतीचा हात’ या सदरातून कुरेशी कुटुंबाची व्यथा मांडली. या वृत्ताने समाजमन गहिवरले. अनेकांनी साजीदला फोन करून हिंमत दिली. काहींनी मोफत उपचार करणाºया इस्पितळांची नावे सांगितली.
‘मायडाय डिजिटल होर्डिंग कंपनी’चे संचालक आकाश सरोदे यांनी ‘लोकमत भवन’ गाठले. साजीद अंजूम यांनाही बोलवून घेतले. कुठलाही गाजावाजा न करता त्याच्या हातात धनादेश ठेवला. यावेळी सरोदे म्हणाले, लहानपणी जो संघर्ष केला त्याची जाण आहे. म्हणूनच जिथे जिथे आवश्यक वाटते तिथे तिथे मदत करण्याचा माझा प्रयत्न असतो. दु:ख याचे वाटते की, ही मदत फार अल्प आहे, असेही ते म्हणाले.