साहेब, तुम्ही बोलले होते आता दक्षिण द्या !
By Admin | Updated: August 30, 2014 02:43 IST2014-08-30T02:43:43+5:302014-08-30T02:43:43+5:30
दक्षिण नागपूरची जागा कोणत्याही परिस्थितीत भाजपलाच मिळावी, यासाठी स्थानिक भाजप नेत्यांनी आग्रही भूमिका घेतली आहे.

साहेब, तुम्ही बोलले होते आता दक्षिण द्या !
नागपूर : दक्षिण नागपूरची जागा कोणत्याही परिस्थितीत भाजपलाच मिळावी, यासाठी स्थानिक भाजप नेत्यांनी आग्रही भूमिका घेतली आहे. दक्षिणचे पदाधिकारी, नगरसेवक, प्रभाग अध्यक्ष यांनी शुक्रवारी सकाळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची वाड्यावर भेट घेतली. साहेब, लोकसभा निवडणुकीत तुम्ही बोलले होते, आम्ही ६० हजारावर लीड मिळवून दिली. आता दक्षिणची जागा भाजपलाच मिळवून द्या, अशी एकमुखी मागणी या नेत्यांनी गडकरींकडे केली.
दक्षिणच्या जागेसाठी भाजप पदाधिकारी आग्रही असून जागा शिवसेनेला गेल्यास आपल्यापैकी एकाला अपक्ष म्हणून रिंगणात उतरविण्याचा छुपा निर्णय घेण्यात आल्याचे वृत्त लोकमतने शुक्रवारच्या अंकात प्रकाशित केले. यानंतर सकाळी दक्षिणमधील भाजप नेत्यांनी गडकरी यांची भेट घेत दक्षिणची मागणी केल्यामुळे लोकमतच्या वृत्तावर अप्रत्यक्षपणे शिक्कामोर्तब झाले आहे. माजी आ. अशोक मानकर, मोहन मते, शहर महामंत्री सुधाकर कोहळे, आरोग्य सभापती रमेश शिंगारे, बळवंत जिचकार, सतीश होले, माजी महापौर कल्पना पांडे, निता ठाकरे, कैलास चुटे यांच्यासह भाजप पदाधिकारी सकाळी वाड्यावर पोहचले. या सर्व पदाधिकाऱ्यांनी गडकरी यांच्या समक्ष आपली बाजू मांडली.
दक्षिण नागपुरात शिवसेना सातत्याने पराभूत होत आली आहे. भाजप कार्यकर्ते परिश्रम घेतात मात्र त्यानंतरही सेनेचे नेटवर्क नसल्यामुळे विजय मिळत नाही. लोकसभा निवडणुकीत भाजपने तळागाळात जाऊन काम केले. येथे काँग्रेसचा आमदार असतानाही भाजपला ६० हजारावर आघाडी मिळाली. दक्षिणमध्ये भाजप बूथ स्तरावर बळकट झाली आहे. कार्यकर्त्यांनी घेतलेल्या परिश्रमाची दखल घेत या वेळी ही जागा भाजपला मिळवून द्यावी, अशी विनंती सर्वांनी गडकरी यांना केली. गडकरी यांची सर्वांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले. या मागणीसंदर्भात आपण प्रदेशाध्यक्ष आ. देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घ्या, अशी सूचना गडकरी यांनी केली. त्यानुसार आता दक्षिणचे पदाधिकारी फडणवीस यांची भेट घेणार आहेत. या सर्व घडामोडीच्या पार्श्वभूमीवर भाजप- शिवसेनेचे संबंध दक्षिणमध्ये तरी ताणले जाण्याची चिन्हे आहेत. (प्रतिनिधी)