साहेब दवाखान्यात चाललो जी...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:07 IST2021-04-12T04:07:40+5:302021-04-12T04:07:40+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोरोनाचा अक्षरश: उद्रेक झाला आहे. दवाखान्यात रुग्णांना बेड नाही, तर बाहेर इंजेक्शन उपलब्ध नाही. ...

साहेब दवाखान्यात चाललो जी...!
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाचा अक्षरश: उद्रेक झाला आहे. दवाखान्यात रुग्णांना बेड नाही, तर बाहेर इंजेक्शन उपलब्ध नाही. अशाही अवस्थेत रिकामटेकड्यांची जत्रेला जावे तसे रस्त्यारस्त्यांवर वर्दळ आहे. नागपुरात दोन दिवसांत ४५८४ रिकामटेकड्यांवर कारवाई केली. त्यावरून काही जण किती बेफिकीर आहेत, त्याचा प्रत्यय यावा.
नागपुरात कोरोनामुळे परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. खासगी सोडा, सरकारी इस्पितळात रुग्णांना जागा मिळेनाशी झाली आहे. बेड तर उपलब्ध नाहीच, रेमडिसिव्हिरसारखे इंजेक्शनही उपलब्ध नाही. त्याची काळाबाजारी सुरू आहे. चार-पाच हजारांच्या इंजेक्शनचे १५ ते २० हजार रुपये मागितले जात आहेत. कृत्रिम तुटवडा करून काही औषधविक्रेते टाळूवरचे लोणी खात आहेत. नागपुरात रेमडिसिव्हिर विकत घेण्यासाठी लोकमत चाैकाजवळच्या एका मेडिकल स्टोअरमध्ये शनिवारी सायंकाळपासून तो मध्यरात्रीपर्यंत रुग्णांच्या नातेवाइकांनी प्रचंड गर्दी केली होती. ही गर्दी एवढी मोठी होती की, ती आवरण्यासाठी पोलिसांना पाचारण करावे लागले. हे सगळे असताना काही बेफिकीर अजिबात ऐकायला तयार नाहीत. ते सैरसपाटा करण्यासारखे घराबाहेर फिरतात. त्यामुळे रस्त्यांवर वर्दळ बघायला मिळते.
विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या ४५८४ वाहनचालकांवर पोलिसांनी कारवाई केली आणि त्यांच्याकडून दोनच दिवसांत साडेसहा लाखांचा दंड वसूल केला.
---
तीच ती कारणे
अत्यावश्यक कामाने घराबाहेर पडायला मुभा आहे. त्यामुळे फिरताना रस्त्यावर कुणी पकडला गेल्यास एकसारखीच कारणे ते पोलिसांना सांगतात. ५० टक्के मंडळी दवाखान्यात, मेडिकलमध्ये जात असल्याचे सांगतात. काही जण किराणा, तर काही जण भाजी घ्यायला जात असल्याचे कारण पुढे करतात.
---
असेही नमुने
खोटे सांगत असल्याचे पोलीस ओळखतात अन् हळूच काही जण ‘साहेब .... खर्रा घ्यायला जातो जी...’, असे बोलतात. काही जण दुकान (दारूचे) बंद असल्याने घशाला कोरड पडली आहे.... त्यामुळे कुठे पव्वा-अध्धा मिळते का, ते बघण्यासाठी फिरत असल्याचे सांगून टाकतात. नागपुरात दिवसभरात कुठे ना कुठे अशा नमुन्यांसोबत पोलिसांची गाठ पडतेच पडते.
----
शनिवारी झालेली कारवाई
वाहनचालक - २४८६
दंड - ३,००,०५० ₹
रविवारी झालेली कारवाई
वाहनचालक -
दंड - ₹
----