एकल तबलावादनाने रंगलेली मैफिल
By Admin | Updated: April 20, 2016 02:57 IST2016-04-20T02:57:57+5:302016-04-20T02:57:57+5:30
संगीताच्या दुनियेतील महत्त्वाचे तालवाद्य म्हणजे तबला. गायनाच्या बदलत्या अभिरुचीनुसार ख्याल गायकीसारख्या मुलायम...

एकल तबलावादनाने रंगलेली मैफिल
स्वरवेद आणि अभ्यंकरनगर नागरिक मंडळाचे आयोजन : पं. मकरंद तुळणकर यांचे तबलावादन
नागपूर : संगीताच्या दुनियेतील महत्त्वाचे तालवाद्य म्हणजे तबला. गायनाच्या बदलत्या अभिरुचीनुसार ख्याल गायकीसारख्या मुलायम व चंचल गायनासाठी गेल्या अनेक शतकापासून याच वाद्याचा उपयोग केला जात आहे. या क्षेत्रातील आजचे आघाडीचे आणि आंतरराष्ट्रीय कीर्तीचे कलावंत पुणे येथील पं. मकरंद तुळणकर यांच्या तबलावादनाने मंगळवारी उपस्थितांना जिंकले.
स्वरवेदतर्फे श्री त्रानेश्वर मंदिर दालन, बजाजनगर येथे पं. तुळणकर यांच्या मार्गदर्शनाखाली तीन दिवसांच्या कार्यशाळेचे यशस्वी आयोजन करण्यात आले. स्थानिक तबलावादकांसाठी अतिशय उपयोगी ठरलेले हे मार्गदर्शन होते. एकूणच नवोदित विद्यार्थ्यांचा सहभाग या कार्यशाळेत होता. अभ्यंकरनगर नागरिक मंडळाने कार्यशाळेसाठी सहकार्य केले. या कार्यशाळेच्या समापनाला पं. तुळणकर यांच्या तबलावादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. तबल्याला बोलांची भाषा असते असेच सर्वांना वाटते. मात्र प्रतिभावंत कलावंत तबलावादनातून सजीवतेचा आनंद देऊ शकतो, याचा प्रत्यय त्यांच्या वादनात होता. त्यांचे वादन म्हणजे संभाषण, गायन आणि नर्तन होते. व्ही. कान्हेरे आणि पं. एस. पंडित आंनिंदो चटॅर्जी यांच्या शिष्य असलेल्या पं. तुळणकर यांनी आपल्या घुमारेदार व सौंदर्यात्मक शैलीच्या वादनाने रसिकांची दाद घेतली. त्यांचे बोलबंदिस लावण्य, सुस्पष्टता वादातीत होते.
कार्यक्रमाला रवींद्र कासखेडीकर, आशुतोष अडोणी प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यशाळेतील विद्यार्थी वेद नेक, साहिल बनीकर, चैतन्य शर्मा, आकांक्षा भेंडे, अथर्व शेष, आदित्य शिलेदार, अजिंक्य ताम्हणकर, अथर्व उपगडे यांनी सामूहिक तबलावादन केले. पं. तुळणकर यांना नरेंद्र कडवे यांनी लहरासंगत केली.
निवेदन दीपाली घोंगे यांचे होते. कलावंतांचे व अतिथींचे स्वागत रवी सातफळे, मनीषा तुळणकर यांनी केले. (प्रतिनिधी)