गायन, संतूरवादनाने बहरलेली सायंकाळ
By Admin | Updated: February 13, 2015 02:15 IST2015-02-13T02:15:40+5:302015-02-13T02:15:40+5:30
पं. सतीश व्यास यांचे सुरेल आणि ताकदीचे संतूरवादन आणि युवा गायक राहुल देशपांडे यांच्या तडफदार तानांच्या बरसातीने बहरलेले गायन आज रसिकांना आनंद देणारे ठरले.

गायन, संतूरवादनाने बहरलेली सायंकाळ
नागपूर : पं. सतीश व्यास यांचे सुरेल आणि ताकदीचे संतूरवादन आणि युवा गायक राहुल देशपांडे यांच्या तडफदार तानांच्या बरसातीने बहरलेले गायन आज रसिकांना आनंद देणारे ठरले. ज्येष्ठ संतूरवादक पं. सतीश व्यास यांनी फारशा प्रचलित नसलेल्या रागाच्या वादनाने रसिकांना आनंद दिला तर राहुल देशपांडे यांनी ख्याल, बंदिश, दादरा आणि अभंग सादर करून रसिकांची दाद घेतली. या दमदार सादरीकरणाने आज पं. सी. आर. व्यास संगीत महोत्सवाला थाटात प्रारंभ करण्यात आला. रसिकांची दाद घेत आजचे हे सादरीकरण नागपूरकरांची सायंकाळ सुरेल करणारे ठरले.
सप्तक आणि महाराष्ट्र ललित कला निधी यांच्या संयुक्त विद्यमाने या पं. सी. आर. व्यास संगीत महोत्सवाचे आयोजन डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात करण्यात आले आहे. या महोत्सवाला गुरुवारपासून प्रारंभ करण्यात आला. आजच्या मैफिलीचा प्रारंभ नागपूरचेच सुप्रसिद्ध ज्येष्ठ गायक पं. वसंतराव देशपांडे यांचे नातू राहुल देशपांडे यांच्या शास्त्रीय गायनाने झाला. राहुल देशपांडे यांच्या उपशास्त्रीय आणि सुगम गायनाचे काही कार्यक्रम नागपुरात झाले पण त्यांचे शास्त्रीय गायन ऐकण्याचा योग नागपूरकरांना आला नव्हता. या महोत्सवात त्यांच्या शास्त्रीय गायन ऐकण्याचा आनंद घेता आला. पं. वसंतराव देशपांडे यांच्या नावाने असणाऱ्या सभागृहात त्यांच्या नातवाचे शास्त्रीय गायन ऐकणे हा औचित्यपूर्ण योग होता. त्यांनी आपल्या गायनाचा प्रारंभ सर्वांगसुंदर पुरिया धनश्री रागाने केला. पुरिया धनश्री म्हणजे सायंकालीन राग. आर्तता, विरहाची भावना मांडतानाच एक अनामिक हुरहूर निर्माण करणाऱ्या या रागाची सौंदर्यस्थळे नेमकेपणाने आपल्या गायनातून सादर करीत राहुल यांनी जाणकार रसिकांना आज जिंकले. रागाची मांडणी आणि विस्तार करताना त्यांनी घेतलेल्या अनेक हरकती आनंद देणाऱ्या होत्या. यानंतर त्यांनी ‘पायलिया झनकार...’ ही चीज तबीयतीने सादर करून रसिकांची दाद घेतली तर केदारनंद रागातील पं. कुमार गंधर्व यांची बंदिश ‘ला दे मेरा म्हाने चुनरी’ ही बंदिश सादर करून त्यांनी उंची गाठली. राहुल यांनी सादर केलेली ‘सावरे ए जय्यो...’ ही चीज तर खास वसंतरावांची आठवण ताजी करणारी होती.
यानंतर त्यांनी ‘गुरुजी मै तो एक निरंजन’ या निर्गुणी भजनाच्या सादरीकरणाने वातावरण भारले. त्यांना तबल्यावर संदेश पोपटकर तर संवादिनीवर श्रीकांत पिसे यांनी साथसंगत केली. तानपुऱ्यावर अर्चना सायगावकर आणि कल्पना खर्डेनवीस यांनी साथ दिली.
यानंतर पं. सतीश व्यास यांच्या संतूरवादनाने मैफिलीचा ताबा घेतला. पं. सतीश व्यास म्हणजे वादनातले सौंदर्य आणि स्वरांच्या बारीक नक्षीकामाचा आनंद देणारे वादक. संतूरवादनावर असलेले त्यांचे प्रभुत्व वादातीतच आहे. त्यामुळेच त्यांचे वादन ऐकण्यासाठी रसिकांमध्ये कुतूहलाचे वातावरण होते. पंडितजी काय वाजविणार याबाबत उत्सुकता होतीच. त्यात त्यांनी फारसा प्रचलित नसलेला कौशिकध्वनी रागात सादरीकरण केले. प्रथम आलाप सादर करतानाच त्यांनी रसिकांना जिंकले. रागसंगीताची अनुभूती दैवी असते याचा प्रत्यय त्यांच्या वादनातून आला. अनेक लाजवाब हरकतींनी आणि रागाच्या काही जागांवर त्यांनी केलेले स्वरांचे नक्षीकाम रसिकांना दाद द्यायला भाग पाडणारे होते. त्यांनी त्रितालात विलंबित, मध्य आणि द्रुतलयीत सादरीकरण करून हा राग हळुवार उकलत नेला. त्यांना तबल्यावर उस्ताद अल्लारखाँ साहेबांचे शिष्य पं. आदित्य कल्याणपूर यांनी साथ दिली. कार्यक्रमाचे निवेदन रेणुका देशकर यांनी केले. (प्रतिनिधी)