लाेकमत न्यूज नेटवर्क
रामटेक : पाेलिसांच्या पथकाने भंडारबाेडी (ता. रामटेक) परिसरात केलेल्या कारवाईमध्ये विना राॅयल्टी मातीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर पकडला. त्यात ट्रॅक्टरच्या चालकास अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून एकूण ५ लाख १ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई गुरुवारी (दि. १८) दुपारी १ वाजताच्या सुमारास करण्यात आली.
आकाश जयप्रकाश डाेनारकर (२१) असे अटक करण्यात आलेल्या आराेपी ट्रॅक्टरचालकाचे नाव असून, ताे ट्रॅक्टरचा मालक असल्याचे पाेलिसांनी सांगितले. रामटेक पाेलिसांचे पथक गस्तीवर असताना त्यांना भंडारबाेडी-घाेगरा राेडवरून मातीची वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाली हाेती. त्यामुळे त्यांनी लगेच या मार्गाची पाहणी केली. त्यांना या मार्गावर एमएच-४०/एल-४८९५ क्रमांकाचा ट्रॅक्टर आढळून येताच पाेलिसांनी हा ट्रॅक्टर थांबवून झाडती घेतली. त्यांना त्या ट्रॅक्टरच्या ट्राॅलीमध्ये माती असल्याचे आढळून आले.
कागदपत्रांच्या तपासणीअंती ती मातीची विना राॅयल्टी वाहतूक असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे त्यांनी ट्रॅक्टर चालक/मालक आकाश डाेनारकरला अटक केली, शिवाय त्याच्याकडून ट्रॅक्टर व माती जप्त केली. या कारवाईमध्ये पाच लाख रुपयांचा ट्रॅक्टर आणि १,२०० रुपयांची एक ब्रास माती असा एकूण ५ लाख १ हजार २०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला, अशी माहिती पाेलिसांनी दिली. याप्रकरणी रामटेक पाेलिसांनी भादंवि ३७९ अन्वये गुन्हा दाखल केला असून, या घटनेचा तपास पाेलीस उपनिरीक्षक राऊत करीत आहेत.