गायन आणि सतारवादनाने झंकारला महोत्सव
By Admin | Updated: August 25, 2014 01:13 IST2014-08-25T01:13:51+5:302014-08-25T01:13:51+5:30
सप्तक आणि महाराष्ट्र ललित कला निधी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित गुणिजान संगीत महोत्सवाचे समापन गौरी पाठारे यांच्या सुमधुर गायनाने आणि प्रतीक चौधरी यांच्या सुरेल सतारवादनाने झाले.

गायन आणि सतारवादनाने झंकारला महोत्सव
नागपूर : सप्तक आणि महाराष्ट्र ललित कला निधी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित गुणिजान संगीत महोत्सवाचे समापन गौरी पाठारे यांच्या सुमधुर गायनाने आणि प्रतीक चौधरी यांच्या सुरेल सतारवादनाने झाले. गायन आणि सुरेल सतारवादनाने हा महोत्सव झंकारला.
सुरमणी गौरी पाठारे यांच्या गायनासह महोत्सवाचे आजचे प्रथम पुष्प गुंफण्यात आले. जयपूर-ग्वाल्हेर घराण्याची गायकी प्रतिध्वनीत करणाऱ्या या गायिकेच्या गायनाची विशेष प्रतीक्षा व अपेक्षा उपस्थित रसिकांना होती. अनेक गणमान्य महोत्सव आणि मराठी चित्रपटात पार्श्वगायन करणाऱ्या या गायिकेचे हे एकूणच प्रशंसनीय गायन होते. गौरी यांनी राग ललितगौरीने गायनाला प्रारंभ केला. विलंबित ‘दरस दिखा जा...’ व द्रुत लयीत ‘काहू समझाऊ मानत नाही...’ या बंदिशीने त्यांनी रागाचा हळुवार विस्तार केला. निकोप सुरेल स्वर, लयकारीचे मोहक विभ्रम, बोलबंदिशींचे लाघव्यपूर्ण उच्चारणामुळे त्यांचे गायन रसिकांची दाद घेणारे ठरले. यानंतर त्यांनी राग दुर्गा तसेच उपशास्त्रीय रसिला दादरा ‘कैसे जिया तरसत पियाबीन...’ सादर करून गायनाचा समारोप केला. त्यांना तबल्यावर संदेश पोपटकर आणि संवादिनीवर श्रीकांत पिसे यांनी साथ केली. मानसी देशपांडे आणि अर्चना सायगावकर यांनी तानपुऱ्यावर साथ केली.
त्यानंतर दिल्ली येथील युवा आणि प्रतिभाशाली कलावंत प्रतीक चौधरी यांचे श्रुतीमधुर सतारवादन सादर करण्यात आले. पं. तानसेन यांच्या सेनिया घराण्याची पूर्वपरंपरा लाभलेल्या या वादकाने राग मारुबिहाग स्वरांकित करून आपल्या चतुरस्र वादनक्षमतेचा परिचय दिला. प्रारंभी ध्रुपद अंगाची सुरेल आलापी व नंतर त्रिताल निबद्ध मसिदखानी गत असे त्यांचे वादन आनंददायी होते. घराणेदार तालीम, रागाची शुद्धता, लयकारीवरील पकड आणि ताल अंगाचे उत्तम संचालन या वैशिष्ट्यांसह त्यांनी रसिकांना प्रभावित केले. विलक्षण दाणेदार स्वरांची बोलकी आंस, मींडची जोरदार अनुभूती व वादनातील माधुर्य यामुळे त्यांनी आपल्या वादनाने या महोत्सवावर आपली मुद्रा टंकित केली. त्यांना तबल्यावर ओजस अडिया यांनी अनुरूप साथसंगत केली. कार्यक्रमाचे निवेदन रेणुका देशकर यांनी केले. कलावंतांचे स्वागत पं. सतीश व्यास व प्रकाश दीक्षित यांनी केले. डॉ. उदय गुप्ते, उदय पाटणकर, विलास मानेकर आणि सहकाऱ्यांनी हा महोत्सव यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)