अडचणीतील व्यक्तीच्या मदतीला ‘सिंघम’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:07 IST2021-05-25T04:07:36+5:302021-05-25T04:07:36+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : तुम्ही अडचणीत आहात का, घाबरू नका! ११२ डायल करा. १० मिनिटात पोलीस तुमच्यापर्यंत पोहोचतील ...

अडचणीतील व्यक्तीच्या मदतीला ‘सिंघम’
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : तुम्ही अडचणीत आहात का, घाबरू नका! ११२ डायल करा. १० मिनिटात पोलीस तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्हाला अडचणीतून बाहेर काढतील. होय, हे आता शक्य होणार आहे.
राज्य पोलीस यंत्रणेतील नागरिकांच्या मदतीसाठी अद्ययावत अशी डायल ११२ सुविधा कार्यान्वित केली जात आहे. नागपूर शहर आणि जिल्ह्यातही लवकरच ती सुरू होणार आहे.
चोरी, घरफोडी, खून, बलात्कार, अपघात, हाणामारी, लुटमार, अथवा कोणताही गुन्हा घडला की सर्वप्रथम पोलीस आठवतात. ते तेथे पोहोचतातही. मात्र, उशिराने! कारण घटनास्थळ शोधण्यासाठी त्यांचा बराच वेळ जातो. त्यामुळे सगळे झाल्यावर पोलीस पोहोचतात, अशी टीका पोलिसांवर नेहमी होते. अडचणीतील व्यक्तीला तत्काळ मदत मिळत नसल्याचीही नेहमीच ओरड होते. ते लक्षात घेऊन राज्य शासनाने अडचणीतील व्यक्तीच्या मदतीसाठी पोलीस तत्काळ घटनास्थळी कसे पोहोचतील या संबंधाने अभ्यासपूर्ण नियोजन केले. त्यातूनच डायल ११२ ही उपक्रमवजा सुविधा अत्याधुनिक यंत्रणासह नागरिकांच्या मदतीसाठी कार्यन्वित केली. नागपूर शहर आणि जिल्ह्यासह राज्यातील सर्वच जिल्ह्यात ती लवकरच सुरू केली जाणार आहे. त्यामुळे कुठेही, कुणीही अडचणीत असेल आणि त्याने ११२ डायल केले तर ‘सिंघम’च्या रूपातील पोलीस त्याच्या मदतीला अवघ्या १० ते १२ मिनिटात अडचणीतील व्यक्तीजवळ पोहोचतील.
---
बहुपयोगी उपक्रम
या उपक्रमामुळे गुन्हेगारी नियंत्रण आणि कायदा व सुव्यवस्थेची घडी नीट राखण्यातही पोलिसांना मदत होणार आहे. नागपूर शहरात ३२ तर जिल्ह्यात २२ पोलीस स्टेशन आहेत.
---
तत्काळ कळेल लोकेशन
वर्षभरापूर्वीच या उपक्रमाचे मुख्य केंद्र मुंबई आणि नागपुरात सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या.
राज्यातील कोणत्याही ठिकाणाहून ११२ वर कुणी फोन केला तर त्याचे लोकेशन या दोन केंद्रात कार्यरत अधिकारी-कर्मचाऱ्यांना कळेल. त्यामुळे येथील मंडळी त्या त्या ठिकाणच्या पोलिसांना तत्काळ निरोप देतील आणि पोलीस तेथे पोहोचले की नाही, त्याचा मागोवाही घेतील.
---
प्रशिक्षण प्रक्रिया सुरू
ठिकठिकाणच्या पोलिसांना या संबंधाने विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. काहींना लॉकडाऊन संपल्यानंतर देण्यात येणार आहे.
---
३४० कर्मचारी नियुक्त
नागपूर जिल्ह्यात यासाठी दोन अधिकारी (सुपरवायझर) आणि ३४० कर्मचारी निवडण्यात आले असून अडचणीत असलेल्या व्यक्तीची तत्काळ मदत कशी करायची, त्याचे प्रशिक्षण त्यांना दिले जात आहे.
--
नऊ नवीन वाहने
या उपक्रमांतर्गत पोलिसांना नवीन वाहनेही उपलब्ध करून देण्यात आली आहे. नागपूर जिल्ह्याला यासाठी ९ वाहने मिळाली आहेत.
--
‘‘या उपक्रमाचे काम अंतिम टप्प्यात असून शक्य होईल तेवढ्या लवकर आम्ही नागपूर जिल्ह्यात जनतेच्या मदतीसाठी हा उपक्रम सुरू करू.’’
- राकेश ओला
पोलीस अधीक्षक, नागपूर.
---