गाणारांना संघातूनच फटाके
By Admin | Updated: June 17, 2016 03:01 IST2016-06-17T03:01:04+5:302016-06-17T03:01:04+5:30
विधान परिषदेच्या शिक्षक मतदारसंघात महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे आमदार नागो गाणार यांना या वेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची साथ मिळण्याची शक्यता कमी दिसत आहे.

गाणारांना संघातूनच फटाके
संजय बोंदरे रिंगणात उतरणार : नाराज गटाचा पाठिंबा
नागपूर : विधान परिषदेच्या शिक्षक मतदारसंघात महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे आमदार नागो गाणार यांना या वेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची साथ मिळण्याची शक्यता कमी दिसत आहे. शिक्षक परिषद आणि संघ या दोन्ही संघटनांचे कार्यकर्ते असलेले संजय बोंदरे यांनी गाणारांना आव्हान देत निवडणूक लढविण्याची तयारी चालविली आहे. विशेष म्हणजे बोंदरे यांना संघाचा पाठिंबा असल्याचे बोलले जात आहे.
गेल्या वेळी शिक्षक परिषदेसह संघाच्या कार्यकर्त्यांनी ‘नागो गाणार, अमदार होणार’ असा नारा दिला होता. कार्यकर्ते जोमाने कामला लागले होते. गाणारांची स्वच्छ प्रतिमाही कामी आली. गाणार विजयी झाले. मात्र, मागील साडेपाच वर्षात गाणारांकडून अपेक्षा पूर्ण न झाल्याने शिक्षक परिषदेचे बरेच कार्यकर्ते त्यांच्यावर नाराज होते. त्यामुळे शिक्षक परिषदेच्या गोटातूनच गाणार यांच्या उमेदवारीला सुरुवातीपासून विरोध सुरू झाला. यातूनच गेल्यावेळचा नारा बदलला गेला. ‘नागो गाणार, तिकीट कटणार’ असे विरोधक ठासून सांगू लागले. मात्र, गाणारांनाच उमेदवारी जाहीर झाली. त्यामुळे विरोधक आणखी दुखावले असून त्यांनी आता उघड बंड पुकारले आहे.
गाणार यांच्या सर्व विरोधकांनी एकत्र येत मराशिपचे कार्यकर्ते असलेले संजय बोंदरे यांना उमेदवारीसाठी पाठबळ दिले आहे. बोंदरे यांनीही आपण गाणार यांच्या विरोधात निवडणूक लढणार असल्याची घोषणा केली आहे. बोंदरे हे भांडेवाडी येथील जय विजय उच्च प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत. संघ परिवाराशी संबंधित संस्थांमध्ये ते पदाधिकारीही आहेत. बोंदरे यांच्या या भूमिकेमुळे संघ परिवार गाणारांना साथ देईल की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे.(प्रतिनिधी)