गायकाने केला फेसबुक लाईव्ह आत्महत्येचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:08 IST2021-03-14T04:08:50+5:302021-03-14T04:08:50+5:30
- एका आठवड्यातील दुसरी घटना लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोरोना संक्रमणामुळे लागू झालेल्या टाळेबंदीने त्रस्त शहरातील गायक कलाकाराने ...

गायकाने केला फेसबुक लाईव्ह आत्महत्येचा प्रयत्न
- एका आठवड्यातील दुसरी घटना
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना संक्रमणामुळे लागू झालेल्या टाळेबंदीने त्रस्त शहरातील गायक कलाकाराने फेसबुक लाईव्ह आत्महत्येचा प्रयत्न केला. लागलीच सहकारी कलावंतांनी त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे.
शनिवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास पारडी येथील रहिवासी प्रवीण मून या ३० ते ३५ वर्ष वयोगटातील गायकाने हाताची नस कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. हा सगळा प्रकार त्याने फेसबुक लाईव्हद्वारे केल्याने, नेटिझन्स आणि शहरातील कलावंतांमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाली. यावेळी त्याला सावरत असताना त्याची मुलगी आणि पत्नी दोघेही रडत होते. फेसबुकवर लाईव्ह स्ट्रिमिंग सुरू असतानाचा हा प्रकार इतर सहकारी कलावंतांनी बघताच, सगळ्यांनी पारडी येथील त्याचे घर गाठले आणि लागलीच त्याला पारडी येथील भवानी हाॅस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. नैराश्येतून घडलेल्या या घटनेत प्रवीणच्या हाताची तस पूर्णत: कापली गेली आहे. विशेष म्हणजे, शुक्रवारीच शहरातील सगळ्या कलावंतांसोबत प्रवीण मून जिल्हाधिकारी, महापौर व पालकमंत्र्यांना भेटले होते. यावेळी त्यांनी कलावंतांना मदतीची मागणी केली होती आणि कलाक्षेत्राला मोकळीक देण्याचीही मागणी केली होती. मात्र, या जबाबदार अधिकारी व मंत्र्यांकडून कोणतीच मदत मिळण्याचे आश्वासन मिळाले नाही आणि झिडकारण्याची भाषा बोलली गेल्याने, प्रवीण नैराश्येत गेल्याचे सहकारी लकी खान यांनी सांगितले. शनिवारी दुपारीही तो अतिशय नैराश्येत होता, असे त्यांनी सांगितले. कलावंताने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलेली ही शहरातील एकाच आठवड्यातील दुसरी घटना आहे. यापूर्वी ५ मार्च रोजी मानेवाडा येथील यश मदनकर यानेही असाच प्रयत्न केला होता.
---------------
बॉक्स...
सरकारने धीर द्यावा
आत्महत्येचा प्रयत्न करणारी ही एकाच आठवड्यातील दुसरी घटना आहे. कलावंतांची स्थिती अतिशय बिकट आहे. कामे बंद आहेत. घरभाडे, शाळेचा खर्च, रोजचा खर्च करणे कठीण झाले आहे. अशा स्थितीत सरकारने धीराची भाषा बोलणे गरजेचे आहे.
- लकी खान, कलावंत
..............