एकस्वरात गायिले ‘वंदे मातरम’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2018 00:03 IST2018-08-15T00:02:42+5:302018-08-15T00:03:41+5:30
स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वदिनी देशप्रेमाचा संदेश देण्यासाठी मातृभूमी प्रतिष्ठानच्यावतीने ‘अखंड भारत संकल्प दिन’अंतर्गत आयोजित सामूहिक वंदे मातरम गायन कार्यक्रमात हजारो शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी एका स्वरात वंदे मातरमचे गायन केले. शहीद-ए-आझम भगतसिंह यांचे पुतणे किरणजीत सिंह यांच्या उपस्थितीत झालेल्या वंदे मातरमच्या गायनाने वातावरण राष्ट्रभक्तीने भारावलेले होते.

एकस्वरात गायिले ‘वंदे मातरम’
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वदिनी देशप्रेमाचा संदेश देण्यासाठी मातृभूमी प्रतिष्ठानच्यावतीने ‘अखंड भारत संकल्प दिन’अंतर्गत आयोजित सामूहिक वंदे मातरम गायन कार्यक्रमात हजारो शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी एका स्वरात वंदे मातरमचे गायन केले. शहीद-ए-आझम भगतसिंह यांचे पुतणे किरणजीत सिंह यांच्या उपस्थितीत झालेल्या वंदे मातरमच्या गायनाने वातावरण राष्ट्रभक्तीने भारावलेले होते.
प्रतिष्ठानच्यावतीने स्थानिक सक्करदरा चौक येथे दरवर्षी सामूहिक वंदे मातरम गायनाचा कार्यक्रम होत असून हे सहावे वर्ष होते. नियोजित कार्यक्रमानुसार सकाळपासून विविध शाळा व महाविद्यालयांचे विद्यार्थी हातात तिरंगा ध्वज आणि देशप्रेमाचे संदेश देणारे फलक घेऊन चौकात गोळा झाले होते. मंचावर किरणजित सिंह यांच्यासह आ. नागो गाणार, डॉ. विलास डांगरे, डॉ. उदय बोधनकर, मेजर हेमंत जकाते, प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि आयोजक डॉ. रवींद्र भोयर, माजी आमदार मोहन मते, कार्याध्यक्ष ईश्वर धिरडे, संयोजक दीपक धुरडे माजी स्थायी समिती अध्यक्ष रमेश सिंगारे, किशोर कुमेरिया, दिव्या धुरडे आदी प्रामुख्याने उपस्थित होते. इटली येथील आध्यात्मिक गुरू गुरुमाही त्यांच्या इटलीतील शिष्यांसह उपस्थित होते. डॉ. रवींद्र भोयर यांनी प्रास्ताविकातून या आयोजनाची भूमिका मांडली. याप्रसंगी ब्रिगेडियर माधव खानझोडे, मेजर जनरल अजित गद्रे, सार्जंट दिनकर कडू, हवलदार विलास दवणे, हवलदार नरेश बर्वे, १९७१ च्या पाकिस्तान युद्धात शहीद झालेले हरिवंश सिंह यांच्या पत्नी प्रीतम कौर यांचा सत्कार करण्यात आला. तसेच सैनिकांच्या कु टुंबीय महिला जयश्री पाठक, अरुणा फाले, छाया कडू, लता धांडे, सुनीता कुंभारे, विद्या लोखंडे यांचाही सन्मान करण्यात आला.
यावेळी बोलताना किरणजित सिंह यांनी स्वातंत्र्य लढ्यातील त्यांच्या कुटुंबातील योगदान आणि शहीद भगतसिंह यांच्या आठवणींना विद्यार्थ्यांसमोर उजाळा दिला. भगतसिंह केवळ एक क्रांतिकारी नव्हते तर वैचारिक पातळीवर त्यांनी उच्च स्तर गाठला होता. देशात आजही भ्रष्टाचार, बेराजगारी आणि जातीय भेदभावाची समस्या कायम आहे. त्यामुळे भगतसिंह व त्यांच्यासोबत काम करणाऱ्यांनी ज्या विचाराने लढा दिला, ते स्वप्न अपूर्ण असल्याची खंत किरणजित सिंह यांनी व्यक्त केली. संचालन अभिजित मुळे यांनी केले. त्यानंतर सहभागी हजारो विद्यार्थी, परिसरातील नागरिकांनी उभे राहून एकसुरात वंदे मातरम्चे गायन केले.