माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांच्या गच्छंतीवर त्यांच्या समर्थकांचे मौन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 11:53 IST2018-02-24T10:34:57+5:302018-02-24T11:53:49+5:30
माजी मंत्री सतीश चतुर्वेदीचे समर्थक माजी मंत्री नितीन राऊत, माजी खासदार गेव्ह आवारी, माजी आ. अशोक धवड, त्यांच्या समर्थनार्थ पुढे येतील, असे अपेक्षित होते. मात्र, कुणीही उघडपणे समोर येऊन चतुर्वेदी यांची बाजु घेतली नाही.

माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांच्या गच्छंतीवर त्यांच्या समर्थकांचे मौन
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांना काँग्रेस पक्षातून काढण्यात आल्यामुळे त्यांचे समर्थक असलेले माजी मंत्री नितीन राऊत, माजी खासदार गेव्ह आवारी, माजी आ. अशोक धवड, विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, नगरसेवक प्रफुल्ल गुडधे त्यांच्या समर्थनार्थ पुढे येतील, असे अपेक्षित होते. मात्र, कुणीही उघडपणे समोर येऊन चतुर्वेदी यांची बाजु घेतली नाही. माजी मंत्री अनिस अहमद यांनी मात्र डबल ए-बी फॉर्म वाटणाऱ्यांवरही कारवाई व्हावी, अशी मागणी केली.
कारवाईनंतर चतुर्वेदी समर्थकांमधील अस्वस्थता वाढली होती. समर्थक नेते एकमेकांशी संपर्क साधून पुढील रणनीती आखण्यात व्यस्त होते. कुणीही या विषयावर उघडपणे बोलण्यास तयार नव्हते. लोकमतने संबंधितांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता काहींनी प्रतिसाद दिला नाही तर काहींनी या विषयाची माहितीच नसल्याचे सांगत बोलणे टाळले. राऊत, धवड यांनी मोबाईलवर प्रतिसाद दिला नाही. गेव्ह आवारी यांनी आपण बाहेर असल्याचे सांगत यावर बोलणे टाळले. प्रफुल्ल गुडधे म्हणाले आपण कारवाईबाबत कुठलेही पत्र वाचलेले नाही. परत फोन करतो, असे सांगून त्यांनी फोन ठेवला. तानाजी वनवे यांनीही या विषयाला बगल दिली.
डबल एबी फॉर्म वाटणाऱ्यांवरही कारवाई व्हावी : अनिस अहमद
- माजी मंत्री अनिस अहमद म्हणाले, चतुर्वेदी यांना निष्कासित करण्यात आल्याचे पत्र आपण व्हॉट्सअॅपवर पाहिले. मात्र, याची कुठलीही अधिकृत माहिती नाही. त्यांना पक्षातून काढण्यात आले असेल तर महापालिकेच्या निवडणुकीत डबल ए-बी फॉर्म वाटणाऱ्यांवरही कारवाई व्हावी. आपण पक्षश्रेष्ठींना भेटून चर्चा करून तशी मागणी करू. याबाबत आपण काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्याशीही चर्चा केली असल्याचेही त्यांनी सांगितले. प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्यावर शाई फेकण्यात आलेल्या घटनेवर त्यांनी नाराजीही व्यक्त केली.