मेट्रो रेल्वेचा श्रीगणेशा

By Admin | Updated: June 1, 2015 02:37 IST2015-06-01T02:37:07+5:302015-06-01T02:37:07+5:30

मेट्रो रेल्वे बांधकामाच्या शुभारंभामुळे नागपूरच्या विकासात नवीन अध्याय सुरू झाला असून त्यामुळे वाहतूक समस्या सुटणार आहे.

Sign up for Metro Rail | मेट्रो रेल्वेचा श्रीगणेशा

मेट्रो रेल्वेचा श्रीगणेशा

नागपूरचा आधुनिकतेकडे विकास : देवेंद्र फडणवीस
नागपूर : मेट्रो रेल्वे बांधकामाच्या शुभारंभामुळे नागपूरच्या विकासात नवीन अध्याय सुरू झाला असून त्यामुळे वाहतूक समस्या सुटणार आहे. मेट्रो रेल्वेमुळे नागपूरचा आधुनिकतेकडे विकास होत असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले.
नागपूर मेट्रो रेल्वेच्या पहिल्या टप्प्यात जमिनीवरील बांधकामाचा शुभारंभ चिचभुवन येथील पुलाजवळ रविवार सकाळी पार पडला. त्यावेळी प्रमुख अतिथी म्हणून मुख्यमंत्री बोलत होते. मंचावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, खासदार कृपाल तुमाने, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, नागपूर मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लि.चे व्यवस्थापकीय संचालक बृजेश दीक्षित, महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तानाजी सत्रे, महापौर प्रवीण दटके, आमदार समीर मेघे, मिलिंद माने, विकास कुंभारे, मल्लिकार्जुन रेड्डी, प्रकाश गजभिये, नासुप्रचे सभापती श्याम वर्धने, उपमहापौर मुन्ना पोकुलवार, एमएडीसीचे मुख्य अभियंता सुभाष चहांदे, पालक सचिव प्रवीण दराडे होते. (प्रतिनिधी)
एज्युुकेशनल हबकडे वाटचाल
प्रकल्पाच्या कामाला आजपासून खऱ्या अर्थाने सुरुवात झाली असून मर्यादित कालावधीत हे काम पूर्ण होईल. रेल्वे मेट्रो प्रकल्पाबरोबरच आयआयएम, एम्स, आयआयएम, आयआयआयटी, नायपर यासारख्या नामांकित संस्था नागपुरात सुरू होत आहेत. नागपूर हे एज्युकेशन हब म्हणून झपाट्याने पुढे येत असून प्रशिक्षित मानव संसाधन तयार करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. परिणामी उद्योगाची भरभराट होईल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.
वस्त्रोद्योग उद्योगांना चालना
विदर्भात अधिकाधिक उद्योग येण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. तसेच पूरक उद्योग येण्यासाठी वस्त्रोद्योग उद्योगांना शासन चालना देत आहे. अमरावती येथे आठ वस्त्रोद्योग सुरू झाले आहेत. यवतमाळ आणि बुलडाणा येथे इंटिग्रेटेड टेक्सटाईल पार्क बनविण्यात येणार आहे. ‘कॉटन टू फॅब्रिक्स’ या संकल्पनेने काम केल्यास विदर्भातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होईल. स्थानिक स्तरावरुन कुशल मनुष्यबळ मिळावे, यासाठी रोबोटिक्सचे संशोधन केंद्र येथे सुरू होणार आहे.
डबल हॉर्स पॉवरचे इंजिन!
मुख्यमंत्री म्हणाले, केंद्रात मोदी सरकारमुळे विकास कार्य वेगाने होत आहे. यातच राज्यात आपण आणि केंद्रात नितीन गडकरी आहेत. ‘डबल हॉर्स पॉवर इंजिनमुळे राज्यात मुख्यत्वे नागपूरच्या विकासाचा वेग वाढला आहे.
जिल्हाधिकाऱ्यांना झोन बदलीचे अधिकार
मुख्यमंत्री म्हणाले, अविकसित ले-आऊट संदर्भात मनपा आणि नासुप्र आवश्यक योजना तयार करणार असून पुरेशा पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न राहील. झोन बदलीची अनेक प्रकरणे मुख्यमंत्री कार्यालयात प्रलंबित आहेत. आता यासंदर्भातील अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्याने अनधिकृत ले-आऊट तयार होणार नाहीत. लोकांना कमी खर्चात विकसित प्लॉट मिळावे म्हणून मेट्रो रिजनचे धोरणही याच प्रकारे करण्यात येत आहे.
गडकरी यांचा संताप
उद्घाटनप्रसंगी राजकीय नेत्यांसोबत फारच कमी लोक उपस्थित असल्याने गडकरी यांनी बृजेश दीक्षित यांच्यावर संताप व्यक्त केला. केवळ आम्हीच (गडकरी, फडणवीस) पूजा करू नये. अशा समारंभात स्थानिक सरपंच, नगरसेवक, नगर परिषद सदस्य आणि अनेक मान्यवरांना आमंत्रित केले पाहिजे. हा प्रकल्प विनादिक्कत पूर्णत्वास येण्यास त्यांची निश्चितच मदत होईल. प्रारंभी बृजेश दीक्षित यांनी नागपूर मेट्रो रेल्वेची विस्तृत माहिती दिली. यावेळी नगरसेवक संदीप जोशी, गिरीश देशमुख, नीलिमा बावणे यांच्यासह किशोर वानखेडे आणि अनेक मान्यवर उपस्थित होते.
राज्याचे संरक्षण धोरण लवकरच
संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांच्याशी झालेल्या सकारात्मक चर्चेनंतरच राज्य सरकार नवीन संरक्षण धोरण तयार करीत आहेत. त्याआधारावर नागपूर आणि औरंगाबाद येथे संरक्षण उत्पादन क्षेत्राला प्रोत्साहन मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे व्यक्त केला. वायुसेनेचा मेंटनन्स कमांड आणि एमआरओ नागपुरात असल्यामुळे येथे संरक्षण उत्पादन क्षेत्राचे भविष्य उज्ज्वल आहे. त्यामुळे संरक्षणविषयक उपकरणांच्या आयातीवर होणाऱ्या कोट्यवधींच्या खर्चाची बचत होईल, शिवाय तरुणांना रोजगारही मिळेल. यासाठी संरक्षण मंत्र्यांचे सहकार्य मिळत आहे.
आंतरराष्ट्रीय विमानतळाबाबत  लवकरच निर्णय व्हावा
आंतरराष्ट्रीय विमानतळाबाबत मुख्यमंत्र्यांनी लवकरच निर्णय घ्यावा. बांधकामासंदर्भात अंतिम निविदा जारी करण्यासाठी राज्य सरकारने तत्परता दाखविल्यास हे काम लवकरच सुरू होईल. संरक्षण मंत्रालयाच्या जमिनीसंदर्भातील सर्वच समस्या निकाली निघाल्या आहेत. अशा स्थितीत राज्य सरकारने यावर लवकरच निर्णय घेण्याची गरज असल्याचे गडकरी म्हणाले. शेतकऱ्यांचे पुनर्वसन आणि त्यांच्या जमिनीच्या मोबदल्याची प्रकरणे तातडीने निकाली काढण्याचे आवाहन त्यांनी केले.

Web Title: Sign up for Metro Rail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.