दुडूदुडू धावण्यासाठी चिमुकलीला हवीय दृष्टी
By Admin | Updated: July 8, 2015 02:40 IST2015-07-08T02:40:05+5:302015-07-08T02:40:05+5:30
जान्हवी...केवळ दीड वर्षाची चिमुकली. आपल्याला काय झालय...ते कळत नाही तिला. या वयात तिच्या डोळ्याला कर्करोगाने ग्रासले.

दुडूदुडू धावण्यासाठी चिमुकलीला हवीय दृष्टी
लोकमत मदतीचा हात
जान्हवीला डोळ्यांच्या कर्करोगाने घातलाय विळखा : वर्षभरापासून आई-वडिलांची पायपीट सुरू
नागपूर : जान्हवी...केवळ दीड वर्षाची चिमुकली. आपल्याला काय झालय...ते कळत नाही तिला. या वयात तिच्या डोळ्याला कर्करोगाने ग्रासले. सारे उपचार झाले पण अखेर डावा डोळा काढावा लागला. नियतीच्या या क्रौर्याला चिमुकली जान्हवीही सामोरी गेली. पण किमान एक डोळा होता. या डोळ््याने तिला तिची आई दिसत होती, बाबा दिसत होते. याही डोळ्याला कर्करोगाने विळखा घातला आहे. चिमुकल्या जान्हवीला आता उजव्या डोळ््यातही वेदना होत आहेत. या डोळ््यानेही तिला कमी दिसते आहे. जान्हवीवर गेल्या वर्षभरापासून सुरू असलेल्या वेदनादायी उपचाराची भीती ती व्यक्त करू शकत नाही. तिच्या असह्य वेदना मातेला व्याकूळ करीत आहे...!!
लहान मुलांसाठी त्यांचे आई-बाबा म्हणजे दैवतच. काहीच कळत नाही पण आपले आई-बाबा आपल्याजवळ असून आपल्याला दिसत नाहीत. त्यांचा आवाज कळतो पण त्यांना पाहता येत नाही, ही भावना त्या चिमुकलीला ग्रासून उरली आहे. तिच्या उपचारासाठी तिचे गरीब माता-पिता जीवाचा आटापिटा करीत आहे.
दृष्टीविना सुंदर जगाची कल्पनाच करू शकत नाही. डोळे म्हणजे देवाने मानवाला दिलेली अनमोल भेटच म्हणता येईल. मात्र, जान्हवीच्या बाबतीत देवाने दृष्टी देताना हात आवरते घेतले.
आपल्या मदतीने जान्हवीला दृष्टी मिळू शकते
अगदी बालवयातच जान्हवी कॅन्सरच्या वेदना सहन करीत आहे. कॅन्सरमुळे एक डोळा तिने गमविला आहे. तरीही एका डोळ्याने ती जग बघू शकते, असे डॉक्टरांनी सांगितले आहे. तिची दृष्टी कायम ठेवण्यासाठी समाजाने मदतीचा हात देण्याची गरज आहे. तिला मदत करण्याची इच्छा असणाऱ्यांनी ९७३०६३३७२९ या क्रमांकावर संपर्क साधवा.
एक डोळा पूर्णत: निकामी
नागपूर : जान्हवी अवघ्या ५ महिन्याची असताना, तिला डोळ्याच्या कॅन्सरने ग्रासले. कॅन्सरच्या उपचारात तिचा एक डोळा पूर्णत: निकामी झाला आहे. आता तिच्या दुसऱ्या डोळ्यालाही कॅन्सरने कवेत घेतले आहे. डॉक्टरांचे तिच्यावर शर्थीचे उपचार सुरू आहे. मात्र त्यासाठी लागणारा खर्च जान्हवीच्या पालकांसाठी डोईजड झाला आहे.
शालू आणि प्रदीप घोडेले यांच्या घरी जान्हवीच्या रूपात एक गोड परी जन्माला आली. तिच्या येण्याने घरात आनंदाचे वातावरण संचारले. मुलीच्या भविष्याची दोघांनी स्वप्नही रंगविली. सारे काही सुरळीत सुरू होते. अशात जान्हवी ५ महिन्याची असताना तिच्या डोळ्याला ‘कांजण्या’ झाल्या. डॉक्टरांकडे उपचारासाठी दाखविले असता, तिला डोळ्यांचा कर्करोग झाल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे घोडेले कुटुंबीयांचे हातपायच गळले. जान्हवीचे वडील प्रदीप पुजारी आहेत. यातून ५ ते ६ हजार रुपये त्यांना मिळवितात. नागपुरातील बिडीपेठ भागात किरायाच्या घरात राहतात. या आजारातून जान्हवीला बाहेर काढण्यासाठी त्यांनी मेडिकलमध्ये उपचार सुरू केले. उपचारात तिच्या एका डोळ्यात १० एमएम व दुसऱ्या डोळ्यात ३ एमएमची गाठ आढळली. डॉक्टरांनी रेडिएशन व किमोथेरपीच्या माध्यमातून गाठ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र डॉक्टरांना अपयश आल्याने, त्यांनी हैद्राबाद येथील ‘सेंटर फॉर साईट’ या रुग्णालयात उपचारासाठी पाठविले. तिथेची तिच्या डोळ्यावर किमोथेरपी झाली. मात्र कॅन्सरची गाठ काही कमी झाली नव्हती. कॅन्सर मेंदूपर्यंत पोहचू नये म्हणून डॉक्टरांनी तिचा डावा डोळाच काढून घेतला. या उपचारात त्यांच्या हाती असलेला पैसाही संपला.
आता जान्हवी एका डोळ्याने बघू शकते. मात्र त्यालाही कॅन्सरने ग्रासले आहे. या डोळ्यातील कॅन्सरच्या गाठीला काढण्यासाठी अत्याधुनिक उपचार मिळाल्यास, जान्हवीला कायमस्वरूपी दृष्टी मिळेल, असा डॉक्टरांचा विश्वास आहे. मात्र यासाठी लागणारा खर्च जान्हवीच्या पालकांसाठी डोईजड आहे. उपचारासाठी २ लाख रुपयांचा खर्च येणार आहे. समाजातील दानदात्यांनी, सहृदय नागरिकांनी तिच्या उपचारासाठी मदत केली तर जान्हवीला हे सुंदर जग आणि तिचे आईबाबा पाहता येतील. (प्रतिनिधी)