शुभम ढेपे खून प्रकरण : तीन आरोपींना जन्मठेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2018 00:53 IST2018-07-20T00:49:30+5:302018-07-20T00:53:12+5:30
सत्र न्यायालयाने गुरुवारी खून प्रकरणातील तीन आरोपींना भादंविच्या कलम ३०२(खून)अंतर्गत जन्मठेप व प्रत्येकी ७५ हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास दोन वर्षे अतिरिक्त सश्रम कारावास, अशी कमाल शिक्षा सुनावली. दंडाच्या रकमेतील दीड लाख रुपये मयताच्या भावाला देण्याचा आदेश देण्यात आला. अतिरिक्त सत्र न्यायाधीश दिनेश सुराणा यांनी हा निर्णय दिला.

शुभम ढेपे खून प्रकरण : तीन आरोपींना जन्मठेप
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सत्र न्यायालयाने गुरुवारी खून प्रकरणातील तीन आरोपींना भादंविच्या कलम ३०२(खून)अंतर्गत जन्मठेप व प्रत्येकी ७५ हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास दोन वर्षे अतिरिक्त सश्रम कारावास, अशी कमाल शिक्षा सुनावली. दंडाच्या रकमेतील दीड लाख रुपये मयताच्या भावाला देण्याचा आदेश देण्यात आला. अतिरिक्त सत्र न्यायाधीश दिनेश सुराणा यांनी हा निर्णय दिला.
दिनेश ऊर्फ दादू शिशुपाल हजारे (१९), प्रीतम अंबादास कावळे (१९) व अमित प्रमोद सोमकुवर (१९) अशी आरोपींची नावे असून, हजारे रावणवाडी तर, अन्य दोन आरोपी कौसल्यानगर येथील रहिवासी आहेत. मयताचे नाव शुभम नारायण ढेपे (२०) होते. तो रावणवाडी येथील रहिवासी होता. शुभमचे आरोपी दिनेश हजारेचा भाऊ ईशांतसोबत एका लग्नात भांडण झाले होते. ईशांतने त्याची माहिती दिनेशला दिली. त्यामुळे दिनेशने अन्य आरोपींसोबत मिळून शुभमचा खून करण्याचा कट रचला. २३ मार्च २०१५ रोजी रात्री ८.४५ च्या सुमारास शुभम घरापुढे उभा होता. दरम्यान, आरोपींनी मोटरसायकलने तेथे जाऊन शुभमवर धारदार शस्त्रांनी वार केले. त्यामुळे शुभम जखमी होऊन खाली कोसळला. त्यानंतर आरोपींनी त्याच्या डोक्यावर दगड टाकला. त्यामुळे शुभमचा जागेवरच मृत्यू झाला.
शुभमचा भाऊ पवन याने अजनी पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध तक्रार नोंदवली. त्यावरून एफआयआर दाखल करून आरोपींना अटक करण्यात आली होती. पोलीस निरीक्षक एस. व्ही. पवार यांनी प्रकरणाचा तपास करून आरोपींविरु द्ध दोषारोपपत्र दाखल केले होते. न्यायालयात सरकारतर्फे अॅड. राजेंद्र मेंढे यांनी कामकाज पाहिले.