उद्यान विभागाचे महामार्ग प्राधिकरणाला शाेकाॅज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:14 IST2021-03-13T04:14:29+5:302021-03-13T04:14:29+5:30
नागपूर : प्रस्तावित अजनी इंटर माॅडेल स्टेशनचे काम करणाऱ्या कंपनीद्वारे अजनी वन परिसरात वृक्षताेडीची परवानगी नसताना काही झाडे ताेडल्याच्या ...

उद्यान विभागाचे महामार्ग प्राधिकरणाला शाेकाॅज
नागपूर : प्रस्तावित अजनी इंटर माॅडेल स्टेशनचे काम करणाऱ्या कंपनीद्वारे अजनी वन परिसरात वृक्षताेडीची परवानगी नसताना काही झाडे ताेडल्याच्या प्रकरणात महापालिकेच्या उद्यान विभागाने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणास (एनएचएआय) शाेकाॅज नाेटीस बजावली आहे. मात्र, सामान्य माणसाने वृक्षताेड केल्यास दंडात्मक कारवाई करणारी महापालिका छुप्या पद्धतीने वृक्षताेड करणाऱ्या माेठ्या संस्थांना केवळ नाेटीस बजावून कारवाईचा देखावा करीत असल्याची टीका पर्यावरणप्रेमींकडून हाेत आहे.
केंद्रीय मंत्र्यांच्या निर्देशानुसार आयएमएस प्रकल्पाचा नवीन डीपीआर अद्याप तयार झाला नसताना प्रकल्पाचे काम करणाऱ्या कंपनीने अजनी रेल्वे काॅलनी परिसरात काम सुरू करून वृक्षताेड करण्याचे वृत्त ‘लाेकमत’ने प्रकाशित केले हाेते. त्यानुसार शुक्रवारी सकाळी मनपाच्या पथकाने अजनी परिसरात पाहणी केली. त्यानंतर दुपारी उद्यान विभागाचे प्रमुख अमाेल चाैरपगार यांच्या नेतृत्वात विभागाच्या पथकाने पुन्हा अजनी वनाचा पाहणी दाैरा केला. यावेळी अजनी वन वाचवा लढ्याचा भाग असलेले कुणाल माैर्य व सहकारी उपस्थित हाेते. परिसरातील चिचबिलाई, बाेर, करंजीची लहान-माेठी १० ते १२ झाडे कापण्यात आल्याचे आढळून आले. शिवाय इतर काही झाडे छाटली गेली हाेती. त्यानुसार कारवाई करीत विभागाने संबंधित कंपनी, तसेच एनएचएआयला कारणे दाखवा नाेटीस बजावण्यात आल्याचे चाैरपगार यांनी सांगितले.
मात्र, मनपाद्वारे केवळ नाेटीस बजावून कारवाई केल्याचा देखावा केला जात असल्याची टीका पर्यावरणप्रेमींनी केली आहे. यापूर्वी आयएमएससाठी अजनी काॅलनी परिसरातील कर्मचाऱ्यांच्या विस्थापनाअंतर्गत तयार हाेत असलेल्या इमारतीसाठी ७० च्या जवळपास झाडे कापली गेली हाेती. उद्यान विभागाने तेव्हा रेल्वेला नाेटीस बजावली हाेती. पुढे कुठलीही कारवाई झाली नाही. आताही तसेच हाेईल, अशी शंका वृक्षप्रेमी नागरिकांनी व्यक्त केली. सामान्य नागरिकाने झाडे ताेडले तर दंडात्मक कारवाई केली जाते, तर मग माेठ्या संस्थांवर नाेटीस बजावून निव्वळ कारवाईचा देखावा का केला जाताे, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
डीपीआर नाही, हस्तांतरणही नाही
निर्देशानुसार आयएमएस प्रकल्पासाठी नवीन डीपीआर तयार करायचा आहे. ताे अद्याप तयार व्हायचा आहे. रेल्वेकडून अजनी रेल्वे काॅलनी परिसराची जागा हस्तांतरणाची प्रक्रियाच पूर्ण झाली नसल्याचे सांगण्यात येत आहे. असे असताना पूर्वी कंत्राट दिलेल्या कंपनीने काम कसे सुरू केले, हा सवाल आहे. रेल्वे आणि एनएचएआयचा भाेंगळ कारभार चालला असल्याची टीका जाेसेफ जाॅर्ज यांनी केली आहे.