शिक्षणाच्या माध्यमातून विकासाचा मार्ग दाखवावा
By Admin | Updated: December 24, 2014 00:44 IST2014-12-24T00:44:51+5:302014-12-24T00:44:51+5:30
उपेक्षित असलेल्या आदिवासी समाजातील तरु णांना मूळ प्रवाहात आणून शिक्षणाच्या माध्यमातून विकासाचे मार्ग दाखविणे आवश्यक आहे. यासाठी निधी आणि लाखो रु पयांच्या योजना असाव्या लागतातच असे नाही,

शिक्षणाच्या माध्यमातून विकासाचा मार्ग दाखवावा
आंदोलनकर्त्या राजश्रीचे मत : मानसिकताही बदलणे गरजेचे
नागपूर : उपेक्षित असलेल्या आदिवासी समाजातील तरु णांना मूळ प्रवाहात आणून शिक्षणाच्या माध्यमातून विकासाचे मार्ग दाखविणे आवश्यक आहे. यासाठी निधी आणि लाखो रु पयांच्या योजना असाव्या लागतातच असे नाही, त्यासाठीची मानसिकता असावी लागते, असे परखड मत राजश्री इवनाते या विद्यार्थिनीने मांडले.
कायद्याचा अभ्यास करीत असलेली राजश्री आज आदिवासी विद्यार्थ्यांचा हक्क निर्धार मोर्चात सहभागी झाली होती. या मोर्चात विविध मागण्यांसाठी ती नारे देत असतानाच सहभागी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्वही समजावून सांगत होती.
राजश्रीला बोलते केले असता ती म्हणाली, एकेकाळी भारतभूचा राजा असलेला मूळ मालक मूळनिवासी आदिवासी आज अन्न, वस्त्र, निवाऱ्यासाठी दाहीदिशा भटकत आहे. शिक्षण आणि विकासापासून आदिवासी समाज अद्याप दूरच आहे. आमच्यापैकी अनेक जणांना दहावीच्या पुढे मजल मारता येत नाही. परिस्थितीमुळे सर्वांचेच शिक्षण अर्धवट राहत आहे. मोलमजुरी करून आयुष्य घालवणे इतकाच त्यांच्यापुढे पर्याय आहे. यावर उपाय शोधणे आवश्यक आहे. सद्यस्थितीत पदवीचे शिक्षण घेत असलेल्या प्रत्येक आदिवासी विद्यार्थ्याने आपल्यासोबत असलेल्या मित्रांना शिक्षणाची आणि हक्कांची साद घालणे आवश्यक आहे. शिक्षणासाठी प्रोत्साहित करणे महत्त्वाचे झाले आहे. याचमुळे चित्र बदलेल.
केंद्र आणि राज्य सरकारकडून या समाजाच्या विकासासाठी कोट्यवधी रुपयांच्या अनेक योजना राबविल्या जात असल्या तरी त्या खऱ्या अर्थाने पोहोचतच नाहीत; ही जबाबदारी प्रामुख्याने सरकारची आहे. परंतु याकडे डोळसपणे पाहण्याचीही जबाबदारी आम्हा युवकांवर आली आहे. पूर्वी सह्याद्री पर्वतरांगांपासून मध्य भारतापर्यंत आदिवासींचे स्वतंत्र, संपन्न, समृद्ध राज्ये होती.
आदिवासी लोक राजे, सरदार, जहागीरदार, किल्लेदार, जमीनदार, संस्थानिक होते. आदिवासी स्त्रिया पुरु षवेश परिधान करून लढणाऱ्या रणरागिणी होत्या, ही आठवणही आजच्या युवकांना करून देण्याची आणि त्यांना त्यासाठी जागृत करण्याची गरज आहे, अशीही ती म्हणाली. (प्रतिनिधी)