परीक्षकांमुळे शो सर्वात मनोरंजक
By Admin | Updated: February 5, 2017 02:30 IST2017-02-05T02:30:27+5:302017-02-05T02:30:27+5:30
सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर नुकत्याच सुरू झालेल्या इंडियन ‘आॅयडॉल-९’ या कार्यक्रमाने

परीक्षकांमुळे शो सर्वात मनोरंजक
‘इंडियन आयडॉल-९’ : तजिंदर, मान्या व रोहित नागपुरात
नागपूर : सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर नुकत्याच सुरू झालेल्या इंडियन ‘आॅयडॉल-९’ या कार्यक्रमाने अल्पावधीतच संपूर्ण देशाला भुरळ घातली आहे. सर्व प्रतिभावंत स्पर्धकांचा अगदी अचूक परफॉर्मन्स आणि सोनू निगम, फराह खान व अनू मलिक या मूळ परीक्षकांचे त्रिकूट यामुळे हा शो भारतीय टेलिव्हिजनवरील सर्वात मनोरंजक शो बनला आहे.
शोमधील स्पर्धक तजिंदर सिंग, मान्या नारंग आणि पीव्हीएनएस रोहित एका मनोरंजन कार्यक्रमात सादरीकरणासाठी नागपुरात आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
तजिंदर सिंगच्या बहुआयामी गायकीमुळे तीनही परीक्षक त्याचे कौतुक करतात. तो म्हणाला, मी मुंबईचा. सांगीतिक प्रवासाची सुरुवात अगदी शून्यापासून केली. गाण्यात आत्मा उतरावा, असा प्रयत्न असतो. त्यातून एक दिवस बॉलिवूडसाठी गाणी रेकॉर्ड करण्याचे आपले स्वप्न आहे.
मान्या नारंग या दिल्लीच्या गायिकेची सीझन-९ मध्ये वाईल्ड कार्ड एन्ट्री झाली आहे. ती म्हणाली. शोची दुसरी इनिंग आहे. दुसरी संधी मिळाल्याने खूपच खूश आहे. पं. रवींद्र सिंग (पटियाला घराणा) यांच्याकडून शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतले आहे. अनू मलिक हे टेक्चर, फराह खान या सादरीकरण आणि सोनू निगम यांचा रियाजवर भर असतो.
पीव्हीएनएस रोहित हा प्रशिक्षित शास्त्रीय गायक आहे. तो म्हणाला, रामचारी आणि व्ही. बालसुब्रमण्यम यांच्याकडे कर्नाटकी संगीताचे धडे घेतले आहेत. भारतातील प्रत्येक भाषेत गाता यायला हवे, अशी इच्छा आहे. संगीत दिग्दर्शक ए.आर. रहेमान यांच्यासाठी गाणे गाण्याचे स्वप्न आहे. परीक्षकांनी टॉपच्या आठ स्पर्धकांची नावे जाहीर केल्यामुळे हा शो आता अतिशय उत्कंठावर्धक टप्प्यावर आला आहे.
या आठवड्यापासून व्होटिंग लाईन्स सुरू होतील. त्यांना आता परीक्षकांच्या मंजुरीसह चाहत्यांकडूनही पसंती मिळायला हवी. ही घोषणा झाल्यानंतर कार्यक्रमाची उत्कंठा वाढावी, यासाठी तिन्ही स्पर्धकांनी नागपूरला भेट दिली. एम्प्रेस सिटी मॉलमधील अलोट गर्दीमध्ये झालेल्या त्यांच्या परफॉर्मन्समध्ये चाहत्यांना त्यांची झलक पाहायला मिळावी. या भेटीत चाहत्यांनी या तिघांवर प्रेम आणि कौतुकाचा वर्षाव केला. त्यांनाही चाहत्यांना भरभरून प्रतिसाद दिला. (वा.प्र.)