ओळख दाखवा,मांजा मिळवा!
By Admin | Updated: January 12, 2017 01:37 IST2017-01-12T01:37:57+5:302017-01-12T01:37:57+5:30
नायलॉन मांजाचे आकर्षण जितके पतंग शौकिनांना आहे तितकीच भीती नागरिकांमध्ये आहे.

ओळख दाखवा,मांजा मिळवा!
नायलॉन मांजाची दामदुपटीत विक्री : उपराजधानीत लपूनछपून सुरू आहे कारभार
नागपूर : नायलॉन मांजाचे आकर्षण जितके पतंग शौकिनांना आहे तितकीच भीती नागरिकांमध्ये आहे. पतंग उत्सवाच्या काळात दुचाकीवर फिरताना मांज्याने केव्हा गळा कापेल, याचा नेम राहिलेला नाही. दरवर्षी मांज्यामुळे अपघात होऊन बळी जाणाऱ्यांची, जखमी होणाऱ्यांची संख्या वाढतेच आहे. मांज्याच्या विरोधात प्रशासन सज्ज झाल्यामुळे पतंग बाजारात उघड्यावर मांज्या विकणे बंद झाले आहे. परंतु लपूनछपून जीवघेण्या मांज्याची विक्री अद्यापही सुरू आहे. लोकमतच्या पथकाने बुधवारी जुनी मंगळवारीतील पतंग बाजारात ग्राहक म्हणून आढावा घेतला असता, नायलॉन मांज्याची विक्री सुरूच असल्याचे उघडकीस आले.
नायलॉनच्या जागी बरेली
नायलॉन मांज्या विरोधात होत असलेल्या कारवाईमुळे पतंग विक्रेत्यांनी दुकानात बरेली मांज्या विक्रीस ठेवला आहे. पतंग शौकि नांना ते सुरुवातीला बरेली मांज्याच उपलब्ध असल्याचे सांगतात. बरेलीमध्येही ४, ६, ९ व १२ तार मांज्या आलेला आहे. विक्रेत्यांना नायलॉन मांज्या आहे, असे विचारल्यावर त्यांच्याकडून बंदी असल्याचे सांगून नॉयलन मांज्याच्या तोडीचा बरेली असल्याचे सांगण्यात येते.
ओळखीच्यांनाच मिळतो
लोकमतच्या पथक पतंग बाजारात फिरत असताना, नायलॉन मांज्या फक्त ओळखीच्या लोकांनाच मिळत असल्याचे निदर्शनास आले. लोकमत प्रतिनिधींनी अनेक दुकानांमध्ये नायलॉनची मागणी केली. त्यांना विक्रेत्यांनी नकार दिला. परंतु पतंग विक्रेत्यांच्या ओळखीच्या असलेल्यांनी विक्रेत्यांना विचारणा केली, तेव्हा त्याने बाजूला बोलावून मांज्याचा सौदा केला.
नायलॉन मांज्याचे दर दुपटीने
विक्रेत्यांच्या परिचित असलेल्या पतंग शौकिनाबरोबर लोकमत प्रतिनिधीने नायलॉन मांज्याची मागणी केली. तेव्हा विक्रेत्याने परिचित असल्याचे बघून नायलॉन मांज्याचे दर सांगितले. कारवाईमुळे मांज्याच्या किमती दुप्पट करण्यात आल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. गेल्या वर्षी २५० रुपयांमध्ये कोनसह मिळणारा मांज्या ५५० रुपयांमध्ये आहे. ५०० रुपयांपर्यंत मिळणारा मांज्या १००० ते १२०० रुपयांना मिळतो आहे. पतंग शौकिनांचा नायलॉन मांज्याचा आग्रह आहे. त्यामुळे आमचा नाईलाज असल्याचे विक्रेत्याने सांगितले.
किरकोळ बाजारातही विक्र ी
इतवारी परिसरातील एका किरकोळ विक्रेत्याला नायलॉन मांज्याची मागणी केली. सुरुवातीला त्याने नकार दिला. बरेली मांज्या चांगला असल्याचे सांगितले. बरेली नको असे सांगितल्यावर त्याने नायलॉन मांज्या मिळेल परंतु बोलवावा लागेल, एका चकरीला ६५० रुपये द्यावे लागतील. पाहिजे असेल तर पैसे द्या, आणून देतो, असे त्याने सांगितले.
दाखविता येणार नाही, पाहिजे असेल तर बोला
मानेवाडा रोडवरील एका विक्रेत्याकडे नायलॉन मांज्याच्या चकरीची मागणी केली. मिळेल परंतु चकरी नाही, कोन असल्याचे सांगितले. ६०० आणि ४०० रुपये असे दर सांगितले. घ्यायचे असेल तर लवकर बोला, आज मिळून जाईल, उद्या मिळेलच की सांगता येत नाही. त्याला मांज्या दाखव असा आग्रह केल्यावर, त्याने पाहिजे असेल तर बोला, दाखविता येत नाही, असे सांगून बोलणे टाळले.
थोड्याशा लाभासाठी विक्रेतेही बेजबाबदार
‘नायलॉन’चा मांजा व काचेचा घोटीव मांजा सहजासहजी तुटत नाही. या बाबीची माहिती असतानादेखील विक्रेते हा मांजा विकतातच कसा हे आश्चर्य आहे. या जीवघेणा मांजा माणसांसह पक्ष्यांच्याही जीवावर बेततो. त्यामुळे धोकादायक मांजावर बंदी घालण्यात आली आहे. असे असताना देखील लपूनछपून हा मांजा विकला जातोच. विक्रेत्यांनी पारंपरिक मांजा विकावा. त्यातूनदेखील त्यांना नफा कमाविता येईल. माणसांचे आणि पक्ष्यांचे बळी घेण्याचे पाप स्वत:वर घेऊ नये, अशी भावना दोन वर्षापूर्वी अशाच मांजाने जखमी झालेल्या राहुल मेश्राम यांनी व्यक्त केली.
पतंगबाजच करतात नॉयलॉन मांजाची मागणी
बंदी असतानादेखील नॉयलॉन मांजा व काचेने तयार केलेला मांजा का विकता असा प्रश्न पतंग व मांजा विक्रेत्यांना केला. त्यावर पतंगबाजाकडूनच या मजबूत न तुटणाऱ्या मांजाची खास मागणी केली जात असल्याचे अनेक विक्रेत्यांनी सांगितले. लोक अधिकचे पैसे देण्यासही तयार होतात. त्यामुळे नाईलाजाने मांजा ठेवावा लागत असल्याचे दुकानदारांनी सांगितले.
या नराधमांना बेड्याच ठोका!
आकाशात उंच भरारी घेणाऱ्या पतंगांचा उत्सव आता वाहनचालकांसाठी धोक्याची बाब बनला आहे. निष्पाप तरुणांचे यामुळे तर बळी गेले आहेत. एखाद्याच्या मृत्यूमुळे त्याच्या कुटुंबीय व नातेवाईकांच्या भावना काय असतील ही बाब कदाचित जनसामान्यांना समजणारदेखील नाही. स्वत:च्या बेजबाबदारपणामुळे दुसऱ्यांना मरणाच्या दारात ढकलणाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हाच दाखल करायला हवा व बेड्या ठोकाव्यात, अशी मागणी समोर येत आहे. यासंदर्भात महानगरपालिका प्रशासन व पोलिस प्रशासनाने योग्य पाऊल उचलावे, असे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे.
दुचाकीस्वारांनी घेतला धसका
घरांचे छत व मैदानांवरचा ‘ओ काट’ चा खेळ आता चक्क रस्त्यांवरच रंगू लागल्याने रस्त्यावर आडवा येणाऱ्या मांज्याच्या रुपाने कोणत्याही क्षणी काळाची झडप वाहनचालकांवर बसू शकते. यापूर्वी संक्रांतीच्या दिवशी याचे प्रत्यंतर नागरिकांना आले आहे. शहरातील निरनिराळ्या भागात दुचाकीस्वार अक्षरश: जीव मुठीत घेऊन