प्रवेश नियंत्रण समितीला कारणे दाखवा नोटीस
By Admin | Updated: July 8, 2015 03:01 IST2015-07-08T03:01:17+5:302015-07-08T03:01:17+5:30
वैद्यकीय आणि उच्च व तंत्र शिक्षणातील प्रवेश नियंत्रण समितीला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी कारणे दाखवा नोटीस बजावली.

प्रवेश नियंत्रण समितीला कारणे दाखवा नोटीस
नागपूर : वैद्यकीय आणि उच्च व तंत्र शिक्षणातील प्रवेश नियंत्रण समितीला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी कारणे दाखवा नोटीस बजावली. एका विद्यार्थिनीच्या प्रकरणात आदेशाची अवमानना केल्यामुळे कारवाई का करण्यात येऊ नये, अशी विचारणा समितीला करण्यात आली असून, यावर तीन आठवड्यांत उत्तर सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
प्रांजली इहरे असे विद्यार्थिनीचे नाव असून, ती कारंजा लाड येथील रहिवासी आहे. तिच्या याचिकेवर न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व इंदिरा जैन यांच्यासमक्ष सुनावणी झाली. राज्य शासनाने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार प्रवेश नियंत्रण समिती स्थापन केली आहे. निवृत्त न्यायमूर्ती डी.के. देशमुख समितीचे अध्यक्ष आहेत. प्रांजलीने अमरावती येथील सिपना महाविद्यालयातून ‘बी.ई. (इन्स्ट्रूमेन्टेशन)’ पदवी मिळविल्यानंतर ‘एम.ई.’ करण्यासाठी ‘गेट’ परीक्षा दिली. तिला नागपूर इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजीमध्ये ‘एम.ई. (एम्बेडेड सिस्टम अॅन्ड कॉम्प्युटिंग)’शाखेत प्रवेश मिळाला. यानंतर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने ‘एम.ई. (एम्बेडेड सिस्टम अॅन्ड कॉम्प्युटिंग)’अभ्यासक्रमासाठी ‘बी.ई. (इन्स्ट्रूमेन्टेशन)’पदवी पात्रता निकष नसल्याचे कारण सांगून प्रांजलीचा परीक्षा अर्ज नामंजूर केला. परिणामी तिने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. प्राथमिक सुनावणीनंतर उच्च न्यायालयाने अन्य महाविद्यालयात जागा रिक्त असल्यास प्रवेश स्थानांतरित करण्यात येईल, असे सांगितले. योगायोगाने सिपना महाविद्यालयातच ‘एम.ई. (डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स)’ अभ्यासक्रमाची जागा रिक्त मिळून आल्यामुळे प्रांजलीला स्थानांतरित करण्यात आले. उच्च व तंत्र शिक्षण संचालकांनी प्रांजलीच्या प्रवेशाला मान्यता प्रदान केली. परंतु प्रवेश नियंत्रण समितीने १५ आॅगस्टनंतर प्रवेश देता येणार नसल्याचे कारण सांगून प्रांजलीच्या प्रवेशाचा प्रस्ताव फेटाळला. परिणामी प्रांजलीने दुसऱ्यांदा उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली आहे. गेल्या १९ एप्रिल रोजी न्यायालयाने प्रांजलीला संबंधित अभ्यासक्रमाच्या पहिल्या व द्वितीय सेमिस्टर परीक्षेत बसू देण्याचे अंतरिम आदेश दिले आहेत. तसेच परीक्षेचा निकाल जाहीर करणे पुढील आदेशावर अवलंबून राहील, असे स्पष्ट केले आहे. आता समितीला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. याचिकाकर्तीतर्फे अॅड. तुषार ताथोड यांनी बाजू मांडली.(प्रतिनिधी)