न्यायव्यवस्थेत तंत्रज्ञानाचा उपयोग वाढणे आवश्यक : नितीन गडकरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2019 23:45 IST2019-02-02T23:43:56+5:302019-02-02T23:45:07+5:30
पक्षकारांना तातडीने न्याय मिळण्यासाठी व प्रलंबित प्रकरणांची संख्या कमी करण्याकरिता न्यायव्यवस्थेमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग वाढणे आवश्यक आहे, असे मत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.

न्यायव्यवस्थेत तंत्रज्ञानाचा उपयोग वाढणे आवश्यक : नितीन गडकरी
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पक्षकारांना तातडीने न्याय मिळण्यासाठी व प्रलंबित प्रकरणांची संख्या कमी करण्याकरिता न्यायव्यवस्थेमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग वाढणे आवश्यक आहे, असे मत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.
नागपूर जिल्हा विधिज्ञ संघटनेच्या नवीन कार्यकारिणीचा पदग्रहण समारंभ रविवारी वसंतराव देशपांडे सभागृहात पार पडला. त्यावेळी ते कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बोलत होते. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती सुनील शुक्रे, न्यायमूर्ती अतुल चांदूरकर, न्यायमूर्ती रोहित देव, प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. बी. सावळे प्रमुख अतिथी म्हणून तर, संघटनेचे माजी अध्यक्ष अॅड. प्रकाश जयस्वाल, माजी सचिव अॅड. नितीन तेलगोटे, नवनिर्वाचित अध्यक्ष अॅड. कमल सतुजा व नवनिर्वाचित सचिव अॅड. नितीन देशमुख व्यासपीठावर उपस्थित होते.
नागपूरला विधिज्ञांचा अभिमानास्पद वारसा लाभला आहे. येथील विधिज्ञांची संपूर्ण देशात प्रशंसा केली जाते. काही नागपूरकर विधिज्ञांनी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती पदापर्यंत मजल मारली. न्यायव्यवस्था ही लोकशाहीचा महत्त्वाचा स्तंभ आहे. येणाऱ्या काळात न्यायव्यवस्थेचे झपाट्याने डिजिटलायझेशन झाले पाहिजे. न्यायमूर्ती, वकील व पक्षकारांनी नवीन तंत्रज्ञानाशी जुळवून घ्यावे.
न्यायव्यवस्थेत तंत्रज्ञानाचा वापर वाढला तरच पुढील विविध आव्हानांना सक्षमपणे तोंड देता येईल, असे गडकरी यांनी पुढे बोलताना सांगितले.
न्या. शुक्रे यांनी न्यायव्यवस्थेतील पायाभूत सुविधा, आधुनिक तंत्रज्ञान, सक्षम न्यायमूर्तींच्या नियुक्त्या, प्रभावी कायदे इत्यादी मुद्यांवर विस्तृत मार्गदर्शन केले. या सर्व क्षेत्रातील त्रुटी दूर केल्यास न्यायव्यवस्थेतील समस्या आपोआप संपतील, असे मत त्यांनी व्यक्त केले. ग्रामीण भागातील न्यायालयांमध्ये आजही आवश्यक पायाभूत सुविधा नाहीत. न्यायाधीश व वकिलांना विविध समस्यांना तोंड देत कार्य करावे लागते. सध्या न्यायालयात दाखल होणाऱ्या प्रकरणांच्या तुलनेत निकाली निघणाऱ्या प्रकरणांची संख्या कमी आहे. त्यामुळे प्रलंबित प्रकरणांची संख्या सतत वाढत आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
न्या. देव यांनी न्यायमूर्ती व वकिलांच्या संबंधावर विचार व्यक्त केले. न्यायमूर्ती व वकिलांचे संबंध चांगले असले पाहिजे. वकिलांनी योग्य सहकार्य केले नाही तर दैनंदिन कामकाज प्रभावित होते, असे त्यांनी सांगितले. न्या. सावळे यांनी न्यायदानाचे कार्य करण्यासाठी नागपूरमध्ये चांगले वातावरण असल्याचे स्पष्ट केले. जयस्वाल, तेलगोटे व सतुजा यांनीही समयोचित विचार व्यक्त केले.