मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात ब्रेक ब्लॉकचा तुटवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2019 12:16 PM2019-10-11T12:16:32+5:302019-10-11T12:18:08+5:30

मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कॅरेज अ‍ॅण्ड वॅगन (सी अ‍ॅण्ड डब्ल्यू)विभाग काहीच गंभीर नसल्याची धक्कादायक माहिती आहे. मागील १५ दिवसांपासून रेल्वेगाड्यांचे ब्रेक ब्लॉक, कटर, वायसर, नटबोल्टचा तुटवडा असताना गरज भासल्यास जुने ब्रेक ब्लॉक लावून काम भागविण्यात येत असल्यामुळे सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला आहे.

Shortage of block breaks in Nagpur section of Central Railway | मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात ब्रेक ब्लॉकचा तुटवडा

मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात ब्रेक ब्लॉकचा तुटवडा

Next
ठळक मुद्देसुरक्षेच्या दृष्टिकोनातून गंभीर बाबजुने साहित्य लावून धावताहेत रेल्वेगाड्या

दयानंद पाईकराव।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : प्रवासाला निघण्यापूर्वी रेल्वेगाडीची योग्य प्रकारे देखभाल करूनच ती सोडण्यात येणे आवश्यक आहे. परंतु मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कॅरेज अ‍ॅण्ड वॅगन (सी अ‍ॅण्ड डब्ल्यू)विभाग काहीच गंभीर नसल्याची धक्कादायक माहिती आहे. मागील १५ दिवसांपासून रेल्वेगाड्यांचे ब्रेक ब्लॉक, कटर, वायसर, नटबोल्टचा तुटवडा असताना गरज भासल्यास जुने ब्रेक ब्लॉक लावून काम भागविण्यात येत असल्यामुळे सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला आहे.
रेल्वेगाडी प्रवासाला निघाल्यानंतर गाडीचे ब्रेक नीट असणे गरजेचे आहे. परंतु नागपुरात प्रायमरी मेंटेनन्स होत असलेल्या गाड्यांसाठी ‘सी अ‍ॅण्ड डब्ल्यू’विभागात मागील १५ दिवसांपासून ब्रेक ब्लॉकच उपलब्ध नाहीत. ब्रेक ब्लॉकची गरज भासल्यास जुने ब्रेक ब्लॉक लावण्यात येत असून, इतर देखभालीच्या साहित्याचा तुटवडा असल्याची माहिती सूत्रांनी दिली. विभागातील बहुतांश रेल्वेगाड्यात बायो-टॉयलेट बसविण्यात आले आहेत. प्रवाशांनी कचरा, इतर साहित्य बायो-टॉयलेटमध्ये टाकू नये यासाठी शौचालयात डस्टबीन ठेवणे आवश्यक आहे. परंतु बहुतांश रेल्वेगाड्यात डस्टबीनच उपलब्ध करून देण्यात आलेल्या नाहीत. याशिवाय शौचालयात बसविण्यात येणारे नळ (ग्रॅव्हिटी पुश कॉक) विभागात उपलब्ध नाहीत. रेल्वेगाडीच्या देखभालीसाठी लागणारे कटर, वायसर, नटबोल्ट, एमसील हे साहित्य उपलब्ध नसल्यामुळे रेल्वेगाड्यांची देखभाल करणारे कर्मचारी जुन्या साहित्यावरच काम भागवीत आहेत. विभागात गरीबरथ, सेवाग्राम अशा निवडक गाड्यांच्या देखभालीकडे लक्ष पुरविण्यात येत आहे. ‘सी अ‍ॅण्ड डब्ल्यू’विभागात कर्मचाऱ्यांचा तुटवडा असून रेल्वेगाड्यांचे मेंटेनन्स करण्यासाठी कर्मचाऱ्यांची गरज आहे. उपलब्ध कर्मचाºयांना डबल ड्युटी करावी लागत आहे. रेल्वेगाड्यांच्या देखभालीसाठी मुंबईवरून साहित्य मागविण्यात येते. साहित्य संपण्यापूर्वी ते मागविणे आवश्यक आहे. परंतु साहित्य संपून १५ दिवस झाले असताना ते मागविण्यात आले नसल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत सहायक वाणिज्य व्यवस्थापक एस. जी. राव यांना विचारणा केली असता पुरेसे साहित्य उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले.

योग्य प्रकारे निरीक्षण करण्याची गरज
रेल्वेगाड्यांची देखभाल करणाऱ्या ‘सी अ‍ॅण्ड डब्ल्यू’ विभागाची तपासणी योग्य प्रकारे करण्याची गरज आहे. दिवसाच ही तपासणी होत असल्यामुळे रात्रीच्या वेळी गाड्यांची कशी देखभाल होते, याकडे सहसा कुणीच लक्ष देत नाही. दिवसा देखभालीसाठी साहित्य लागल्यास ऐनवेळी खरेदी करून मागविण्यात येते. परंतु रात्रीच्या वेळी जुने साहित्यच वापरून रेल्वेगाड्यांची देखभाल होत असल्याची धक्कादायक माहिती आहे.

Web Title: Shortage of block breaks in Nagpur section of Central Railway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.