अतिक्रमण कारवाईच्या विरोधात दुकानदारांचा बंद
By Admin | Updated: May 21, 2015 02:34 IST2015-05-21T02:34:50+5:302015-05-21T02:34:50+5:30
सीताबर्डी मेनरोडवर अतिक्रमण कारवाईच्या नावाखाली १२५ दुकाने तोडण्यात आली. यातील अनेक दुकानांचे बांधकाम वैध आहे.

अतिक्रमण कारवाईच्या विरोधात दुकानदारांचा बंद
नागपूर : सीताबर्डी मेनरोडवर अतिक्रमण कारवाईच्या नावाखाली १२५ दुकाने तोडण्यात आली. यातील अनेक दुकानांचे बांधकाम वैध आहे. या अन्यायाच्या विरोधात बुधवारी सीताबर्डी मेनरोडवरील व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवून महापालिका व पोलीस प्रशासनाचा निषेध केला.
व्यापाऱ्यांना कोणत्याही स्वरूपाची सूचना वा नोटीस न बजावता ही कारवाई करण्यात आली. अधिकारी हुकूमशहासारखे वागले. व्यापाऱ्यांची मते जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी कारवाईवर नाराजी व्यक्त केली. सीताबर्डी मेनरोड पूर्वी १८ फुटाचा होता. १९५८ नंतर तो ४४ फुटाचा करण्यात आला. तत्कालीन आयुक्त टी. चंद्रशेखर यांनी अतिक्रमण हटवून रस्ता ६० फुटाचा केला. त्यानुसार येथील दुकाने वैध ठरविण्यात आली होती.
१५ वर्षापूर्वी एम.एस. पांडे अॅन्ड सन्स ते बुटी वाडा परिसरापर्यतची दुकाने आधीच हटविण्यात आली आहे. त्यामुळे आता अतिक्रमणाचा प्रश्न येतोचे कुठे असे व्यापाऱ्यांचे म्हणणे होते. वाहतूक पोलिसांना सीताबर्डी चौकातील आॅटोची अवैध वाहतूक दिसत नाही. अपघाताला धोका असूनही त्यांचेवर कारवाई केली जात आहे. दुसरीकडे वर्दळीच्या भागात हातगाडीवाले फिरतात ते मनपा अधिकाऱ्यांना का दिसत नाही. असा प्रश्न व्यापाऱ्यांनी केला. (प्रतिनिधी)
४२ वर्षांपूर्वीचे दुकान तोडले
मंगळवारी करण्यात आलेली अतिक्रमण हटविण्याची कारवाई चुकीची व बेकायदेशीर असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. अतिक्रमण विरोधी पथकाने कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना वा नोटीस न देता ४२ वर्षापर्वीचे दुकान तोडल्याचा आरोप जुगलकिशोर अरोरा यांनी केला. पोलिसांनी त्यांचा मुलगा विनीत अरोरा याला अकारण मारहाण केली. यामुळे तो जखमी झाल्याचे त्यांनी सांगितले.
हॉकर्सची गर्दी
सीताबर्डी मेनरोडवर हॉकर्सचे अतिक्रमण आहे. परंतु मनपा व पोलीस विभाग त्यांच्या विरोधात क ोणतीही कारवाई करीत नसल्याचे सीताबर्डी व्यापारी असोसिएशनचे उपाध्यक्ष प्रदीप गुप्ता यांनी सांगितले. कारवाईच्या नावाखाली व्यापाऱ्यांना त्रस्त करण्याचा हा प्रकार असल्याचे ते म्हणाले.
हाताला गंभीर जखम
पापे जूस सेंटर फूटपाथपासून आत आहे. असे असतानाही ४२ वर्षापूवींचे दुकान तोडण्यात आले. कारवाई दरम्यान हाताला गंभीर जखम झाल्याचे विनीत अरोरा यांनी सांगितले. अतिक्रमणाच्या नावाखाली दुकान तोडल्याने रोजगाराचा प्रश्न उभा ठाकल्याची व्यथा त्यांनी मांडली.
अन्यायाचा विरोध करू
व्यापाऱ्यांना हकनाक वेठीस धरले जात आहे. या अन्यायाचा विरोध करण्याचा इशारा व्यापारी जोगीनारायण चौरसिया यांनी दिला आहे. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत व्यापाऱ्यांनी बुधवारी दुकान बंद ठेवली.
नुकसान भरपाई द्यावी
अतिक्रमण कारवाईच्या नावाखाली व्यापाऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. काही व्यापाऱ्यांना दुकानातून सामान काढण्यालाही वेळ दिला नाही. विनाकारण दुकानाचे शटर तोडण्यात आले. झालेल्या नुकसानीची भरपाई द्यावी, अशी मागणी मनसेचे जिल्हा सचिव गणेश मुदलीयार यांनी केली आहे.
ही तर अधिकाऱ्यांची हुकूमशाही!
अतिक्रमण हटविण्याचा नावाखाली मनपाच्या प्रवर्र्तन विभागाने नोटीस न देता कारवाई केल्याने व्यापाऱ्यात भीती निर्माण झाली आहे. अशा हुकूमशाही कारवाईचा निषेध करीत असल्याचे सीताबर्डी व्यापारी असोसिएशनचे सचिव विजयकुमार अग्रवाल म्हणाले.सीताबर्डी मेनरोडवरील ५० दुकाने प्रवर्तन विभागाच्या निर्देशावरून हटविण्यात आली. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली आहे. या संदर्भात योग्य निर्णय घेण्याचे आश्वासन त्यांनी दिले असल्याचे अग्रवाल यांनी सांगितले.