नागपूर : व्हीआयपी ताफ्याजवळ जाण्यापासून रोखल्याच्या संतापातून एका व्यक्तीने भर रस्त्यावर महिला वाहतूक पोलिसाला मारहाण करत तिचा विनयभंग केला. भर गर्दीच्या ठिकाणी घडलेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी हा प्रकार घडला. एकीकडे गुन्हेगारांवर अद्यापही हवा तसा वचक आला नसताना महिला पोलीस कर्मचाऱ्यावर सर्वांसमोर हात उचलण्याची आरोपींकडे हिंमत येते तरी कुठून असा सवाल उपस्थित होत आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
दहीबाजार पुलाजवळ सोमवारी सायंकाळी हा धक्कादायक प्रकार झाला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा ‘कॉन्व्हॉय’ आझमशाह चौकाकडून शांतीनगरकडे जाणार असल्याची वाहतूक पोलिसांकडून माहिती मिळाली. मारवाडी चौक, दहीबाजार पुलाच्या मार्गाने ताफा जाणार असल्याने पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला.
सायंकाळी तेथे वाहतूकीची कोंडी होऊ नये यासाठी जागोजागी पोलीस तैनात होते. सायंकाळी पावणे सात वाजताच्या सुमारास गडकरी यांचा ताफा दहीबाजार पुलाजवळ पोहोचला. त्यावेळी तेथे दोन महिला कर्मचारी कर्तव्यावर होत्या.
तू कॉन्व्हॉयकडे जाऊ नको
वाहतूक थांबविण्यात आली होती. त्यावेळी सैय्यद सज्जाद मुजफ्फर अली (कश्यप कॉलनी, शांतीनगर) हा मालधक्क्याकडून आला व रस्ता ओलांडू लागला. ते पाहून महिला पोलीस कर्मचाऱ्याने त्याला व्हीआयपी ताफा जात असल्याने वाहतूक थांबविली आहे. तू कॉन्व्हॉयकडे जाऊ नको असे म्हणत त्याला थांबविले.
यावरून संतापलेल्या सैय्यदने महिला पोलीस कर्मचाऱ्याला शिवीगाळ केली. त्यानंतर त्याने तिला धक्काबुक्की केली. व्हीआयपी ताफा तेथून गेल्यानंतर सैय्यदने महिला कर्मचाऱ्याला मारहाण सुरू केली. त्यानंतर तिचा शर्ट पकडून विनयभंग केला.
भर रस्त्यावर ओढत नेले
आरोपी सैय्यदने महिला कर्मचाऱ्याला ब्रीज व्ह्यू हॉटेलपर्यंत ओढत नेले.तिथे मोठ्या प्रमाणावर लोकांची गर्दी होती. मात्र तो मारहाण व शिवीगाळ करतच होता. इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी धाव घेतली. उपस्थित लोकांनीदेखील ‘जाऊ दे आपलेच लोक आहेत’ असे म्हणत त्याला थांबविण्याचा प्रयत्न केला. पोलिसांना पाहताच तो गर्दीचा फायदा घेत तेथून फरार झाला. गर्दीतील लोकांनी त्याचे नाव पोलिसांना सांगितले. महिला पोलीस कर्मचाऱ्याने लकडगंज पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.
पोलीस अधिकाऱ्यांनी घेतली धाव
हा प्रकार कानावर पडताच अनेक अधिकाऱ्यांनी लकडगंज पोलीस ठाण्याकडे धाव घेतली. काही अधिकारी घटनास्थळीदेखील पोहोचले. संबंधित आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.