- आनंद डेकाटे, नागपूरमहावितरणच्या नागपूर परिमंडळाने वीजचोरी करणाऱ्यांविरुद्ध आपली मोहीम अधिक तीव्र केली असून, एप्रिल ते डिसेंबर २०२५ या नऊ महिन्याच्या कालावधीत महावितरणच्या स्थानिक तांत्रिक विभागाने केलेल्या धडक कारवाईत एकूण १,९६३ ठिकाणी थेट वीजचोऱ्या उघडकीस आणल्या आहेत. याशिवाय ज्या कारणासाठी वीज घेतली त्याव्यतिरिक्त इतर कारणासाठी अनधिकृत वापर करणाऱ्या १६७ ग्राहकांवरही कार्यवाही करीत एकूण २,१३० ग्राहकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. महावितरणच्या या मोहिमेमुळे वीजचोरांचे धाबे दणाणले आहेत.
या नऊ महिन्यांच्या कालावधीत नागपूर जिल्ह्यातील तब्बल ११,९६२ ग्राहकांच्या वीज यंत्रणेकडील तपासणी करण्यात आली. त्यापैकी १,९६३ ग्राहकांनी तब्बल ४ कोटी ९९ लाख ५८ हजार रुपयांच्या २३ लाख ८२ हजार ६३१ युनिट्सची वीज चोरल्याचे स्पष्ट झाले आहे.
यापैकी या चोरीच्या बदल्यात महावितरणने नियमानुसार देयके आणि तडजोडीपोटी १ कोटी ३ लाखांचा दंड असा एकूण ६ कोटी २ लाखाचे देयक संबंधित ग्राहकांना आकारला आहे. यातील ३६ ग्राहकांनी तडजोड करण्यास नकार दिल्याने किंवा गंभीर स्वरूपाची चोरी केल्याने त्यांच्यावर विविध पोलीस ठाण्यांत विद्युत कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
ही विशेष मोहीम महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्रा, संचालक (संचलन) सचिन तालेवार, प्रादेशिक संचालक परेश भागवत आणि मुख्य अभियंता दिलीप दोडके यांच्या थेट मार्गदर्शनाखाली राबवली जात आहे.
तंत्रज्ञानाचा वापर करून वीजचोरीच्या 'अतरंगी' क्लुप्त्या
या मोहिमेत वीजचोरीचे अत्यंत प्रगत आणि धक्कादायक प्रकार उघडकीस आले आहेत. कारवाई करण्यात आलेल्या ग्राहकांपैकी ९७४ जणांनी थेट मुख्य वीज वाहिनीवर 'आकडा' टाकून चोरी केली होती. मात्र, उर्वरित ९८९ ग्राहकांनी तांत्रिक छेडछाडीचा मार्ग अवलंबला होता. यामध्ये मीटरमध्ये रिमोट कंट्रोल बसवून ते दुरूनच बंद करणे, मीटरच्या मागील बाजूस सूक्ष्म छिद्र पाडून रोध निर्माण करणे, मीटर संथ करण्यासाठी अंतर्गत सर्किटमध्ये बदल करणे किंवा मीटर पूर्णपणे बंद पाडणे अशा 'अफलातून' क्लुप्त्यांचा समावेश आहे. याशिवाय, ज्या कारणासाठी वीज घेतली त्याव्यतिरिक्त इतर कारणासाठी अनधिकृत वापर करणाऱ्या १६७ ग्राहकांवरही कारवाई करून ३९.३० लाखांची देयके आकारण्यात आली आहेत.
Web Summary : Nagpur MSEDCL cracks down on power theft, uncovering ₹5 crore worth in nine months. Over 2,130 customers face penalties; some face criminal charges for tampering.
Web Summary : नागपुर में एमएसईडीसीएल ने बिजली चोरी पर शिकंजा कसा, नौ महीनों में 5 करोड़ रुपये की चोरी का खुलासा। 2,130 से अधिक ग्राहकों पर जुर्माना, कुछ पर आपराधिक आरोप।